कणकवली
पालकमंत्र्यांचे वजन नसल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गला अत्यल्प प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. कमी लसी येत असल्याने सर्वच केंद्रांवर लसीकरणाचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केला.
श्री.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्गात १८ ते ४४ आणि ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिक लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. शासकीय रूग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. मात्र लसीचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठाच होत नसल्याने अनेक नागरिकांना आरोग्य केंद्रावरून माघारी पाठवले जात आहे. या प्रकाराकडे आता तरी पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयूबाबत व्हायरल होणार्या फोटोच्या अनुषंगाने चौकशी देखील व्हायला हवी.
ते म्हणाले, आज जिल्ह्याला ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू केला असला तरी येथेही ३० टक्के ऑक्सिजन सिलेंडर मधील असतो. त्यामुळे या प्लांट सोबतच सावंतवाडी, कणकवली, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवायला पाहिजे. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली जाते मात्र अद्याप व्हेंटिलेटर का बसवले जात नाहीत? उपलब्ध वेंटीलेटर महिला रुग्णालय व अन्य ठिकाणी बसवा. आज लोक वेंटीलेटर, ऑक्सिजन अभावी मरत आहेत अशा परिस्थितीत तातडीने कारवाई होत नसेल तर घोषणाबाजी करून उपयोग काय? जिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणून जे काम करताहेत त्यांचा इतर ठिकाणी वापर केला जातो. अशा परिस्थितीत रिपोर्टमध्ये काही चुका झाल्यास जबाबदार कोण? पालकमंत्र्यांनी दोन दिवसात शववाहिनी देण्याचे आश्वासन दिले, मात्र दोन आठवडे उलटून गेले तरीही त्याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही. अशा पोकळ घोषणा देण्यात अर्थ काय? हा सर्व प्रकार म्हणजे जिल्हावाशीयांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे असेही श्री उपरकर यांनी म्हटले आहे.