दोन महिन्याचा मेहनताना कोविड फंडासाठी; प्रशासन व ग्रामस्थांकडून कौतुक…
बांदा
बांदा तलाठी सजात सात-बाराच्या माध्यमातून मिळणार दोन महिन्यांचा मेहनताना सुमारे २५ हजार रुपये बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी कोविड फंडात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमती नाडकर्णी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्यांमधून कौतुक होत आहे.
श्रीमती नाडकर्णी या बांदा गावच्या सुकन्या असून कोविड महामारीच्या काळात त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. गतवर्षी कोरोना काळात परप्रांतीय कामगारांना त्यांनी सहकुटुंब अन्नदान केले होते. तसेच महापुराच्या काळात तात्काळ नुकसानीचे पंचनामे करत कित्येकांना मदत मिळवून दिली होती.
कोरोना महामारीच्या काळात गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी श्रीमती नाडकर्णी यांनी सात-बारा मेहनतानातून एप्रिल व मे महिन्यात मिळणारा संपूर्ण मेहनताना त्यांनी कोविड फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात धडाडीने व सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या श्रीमती नाडकर्णी यांचा आदर्श इतर शासकीय अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.