देशभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. गेल्या काही काळापासून दिवसाला कोरोनाचे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तसंच रोज अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरचीही कमतरता जाणवत आहे, त्यामुळे अनेक भारतीय तसंच परदेशी क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने पीएम केयर फंडमध्ये 37 लाख रुपयांची तर ब्रेट लीने एक बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले.
शिखर धवन आणि जयदेव उनाडकट यांनीही त्यांच्या आयपीएल मानधनातली काही रक्कम कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरने ऑक्सिजन कॉनसनट्रेटरसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
तर आता अजिंक्य रहाणे महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. अजिंक्यने मिशन वायूसाठी 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दिले आहेत. एमसीसीआयए म्हणजेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या मिशन वायू मोहिमेला पाठिंबा म्हणून रहाणेने ही मदत केली आहे. अजिंक्यने दिलेले हे 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर महाराष्ट्रात जिकडे कोरोनाचा कहर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये पाठवले जाणार आहेत.