You are currently viewing आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम: माजी आमदार राजन तेली

आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम: माजी आमदार राजन तेली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. अशी एकीकडे अवस्था असताना जिल्हा शल्य चिकित्सकाकडून ऑक्सीजन, व्हेटीलेटर बेड उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. जर हे खरे असेल तर प्रत्यक्षात आमच्या सहीत अनेकांनी संपर्क साधूनही बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. बेडसाठी नातेवाईक आक्रोश करत आहेत. मग यात नेमके काय आहे, जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण का वाढले? जिल्ह्याला लसीकरणाचा कोटा पुरेसा का मिळत नाही असे अनेक प्रश्न असून सत्ताधारी केवळ फोटो काढण्यात मग्न असून जिल्ह्याला कोणीही वाली उरलेला नाही, अशी परिस्थिती असल्याचा गंभीर आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे.
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाला आमचे नेहमीच सहकार्य असून यापुढेही राहणार आहेच. मात्र एकीकडे जिल्हा शल्यचिकित्सक सांगतात जिल्ह्यात 235 ऑक्सीजन बेड शिल्लक आहेत, वेंटीलेटरचे 42 वेळ शिल्लक आहेत. जर हे खरे असेल तर मी स्वतः व अनेकांनी फोन करूनही बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. अनेकदा कुणी फोनही उचलत नाहीत. जर बेड उपलब्ध असतील तर त्याबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पीआरओ नेमा. जर बेड शिल्लक असतील तर बेडसाठी रुग्णांचे नातेवाईक एवढा आक्रोश कशासाठी करतात? आज जिल्ह्यातली स्थिती आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी आहे. सावंतवाडीला गतवर्षी कोरोना वेळी दिलेले दहा वेंटिलेटर वापराविना पडून आहेत. कणकवलीला दिलेल्या पैकी चार मागे घेतले आणि दोन वापराविना आहेत. जर अशी अवस्था असेल तर जिल्ह्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक आणि कुणाकडे पाहायचे?सत्ताधारी आमदार व पालकमंत्री ऑक्सीजन प्लांटपासून सीसिसीसेंटर पर्यंत सुरू केलेल्याचे केवळ फोटो छापून आणत आहेत. नुसती सेंटर सुरू करून काय उपयोग? त्याठिकाणी रुग्णांना योग्य सेवासुविधा जर नसतील तर नुसते सेंटर उपयोगाचे नाहीत. सेंटर सुरू करता त्याठिकाणी परिपूर्ण सेवा मिळते का याचाही विचार व्हायला हवा. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना ने मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मृत्यूचे प्रमाण एवढे का वाढले? आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. प्रशासनाला आमचे सहकार्य आहे. मात्र एकीकडे मृत्यु प्रमाण वाढते दुसरीकडे विचारणा केली असता बॅड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते आणि प्रत्यक्षात बेड उपलब्ध असल्याची खोटी माहिती दिली जाते. या सगळ्यात नेमकी माहिती दडवण्याचा उपद्व्याप का केला जातो? अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी यात लक्ष घालणार आहेत का? असा सवालही श्री. तेली यांनी केला आहे. ज्या ठिकाणी सी सेंटर सुरू केलेली आहेत तेथून एखाद्या रुग्णाला अत्यावश्यक वेळी हलवण्याची गरज आली तर साधी रुग्णवाहिका ही उपलब्ध नसते. अशा वेळी काय करावे. आज जिल्ह्यात ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर बेडची गरज लागली तर दाखल असलेला कधी जातो आणि आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा नंबर लागतो एवढी दुर्दैवी अवस्था आलेली आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण एवढे का वाढते? पंधरा पंधरा दिवस रुग्ण दाखल असतानाही नंतर व्हेंटिलेटरवर का जातात? या सार्‍या मागे नेमकी काय स्थिती आहे हे सुद्धा कुठेतरी तपासण्याची गरज आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या कारभारावर नेमके नियंत्रण कोणाचे आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यात जो कारभार सुरू आहे तो कोणीही वाली नसल्याची स्थिती आहे. लसीकरणाबाबत अत्यंत वाईट अवस्था आहे. दुसरा डोस मिळण्याची तारीख उलटून जाऊनही अनेकांना डोस मिळालेला नाही. जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही आहे. सत्ताधारी मंडळी नेमके काय करतायेत? आज ऑक्सीजन प्लांटची घोषणा केली जाते.मात्र पहिली लाट संपल्यानंतर दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली, त्यावेळी ही सारी मंडळी काय करत होती? आज जिल्ह्यासाठी ॲम्बुलन्स नाहीत. ॲम्बुलन्स देण्याची घोषणा करून किती महिने उलटले, अशावेळी जिल्ह्यातील लोकांनी नेमके काय करायचे याचे उत्तरही प्रशासनाने देण्याची गरज आहे असेही श्री. तेली यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा