हिरण्यकेशी परिसरात वनविभागाच्या कॅमेऱ्यात छबी कैद
सावंतवाडी
आंबोली परिसरात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले असून हिरण्यकेशी परिसरात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा पट्टेरी वाघ कैद झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापूर्वीच आंबोली येथील एका शेतकऱ्यांच्या गाईचा फडशा याच पट्टेरी वाघाने पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सह्याद्री पट्टयात तसेच तिलारी जंगल परिसरात हा पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे. सदर पट्टेरी वाघाचे दर्शन वनखात्याने जंगल भागात लावलेल्या कॅमेऱ्याने टिपले गेले आहे. हा पट्टेरी वाघ आंबोली हिरण्यकेशी जंगल भागात असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. एका मृत गायीसमोर हा वाघ उभा असल्याचे या छायाचित्रात स्पष्टपणे दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी या परिसरातील गाईचा वाघाने फडशा पाडला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी हा पट्टेरी वाघ असल्याचा दावाही केला होता. परंतु यावेळी ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे वनविभागाकडून कानाडोळा केला होता. मात्र, त्यानंतर हिरण्यकेशी जंगल भागात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे. त्यामुळे आंबोलीत पट्टेरी वाघ वास्तव्यास असल्याचे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.
सह्याद्री पट्टयात राधानगरी ते तिलारी घाट परिसरात ते कोल्हापूर सिंधुदुर्ग या सह्याद्रीच्या जंगल भागात गेल्या काही वर्षापासून पट्टेरी वाघाचे अस्तित्व दिसून आले होते. या परिसरात पट्टेरी वाघ सर्वत्र फेरफटका मारत असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले असून मागील काही वर्षापूर्वी आंबोली त पाटगावच्या जंगलात ब्लॅक पँथर ही आढळून आला होता.त्यानंतर पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने वनविभागाची जबाबदारी आणखी वाढली असून वन्यप्रेमींमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोशल मिडिया वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगा : वन्यप्रेमींचे आवाहन
दरम्यान, या पट्टेरी वाघाचा नेमका वावर कोणत्या भागात आहे हे वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केल्यामुळे शिकाऱ्यांकडून सदर वाघाला भिती निर्माण होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात जेमतेम तीन पट्टेरी वाघांचे अस्तित्व निदर्शनास आले आहे.मध्यंतरी हा आकडा शून्यावर आला होता. त्यामूळे जरी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले तरी ही सोशल वृत्तवाहिन्यांनी त्याबाबतचे निश्चित स्थान प्रकाशित करू नये त्याबाबत संयम बाळगावा असे आवाहन वन्यप्रेमींकडून केले जात आहे.