वैभववाडी
कोरोनात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेसाठी आमदार नितेश राणे हे खरे आधार ठरत आहेत. आमदार नितेश राणे यांनी १०० पीपीई किट व मास्क बुधवारी वैभववाडी तालुक्यातील शासकीय यंत्रणेला दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लागणारे गरजेचे साहित्य पुरवल्याबद्दल तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
सद्यस्थितीत कोवीड केअर सेंटरमध्ये जवळपास ६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेकडे पीपीई किट असणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर गावात या आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्याची केलेली रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही ग्रामस्थ पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक व इतर कर्मचाऱ्यांना करावे लागतात. अशा वेळी त्यांना पीपीई किट पुरवणे फार गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर तहसीलदार रामदास झळके यांनी आ. नितेश राणे यांच्याकडे पीपीई किट व मास्कची मागणी केली होती. ती मागणी आ. नितेश राणे यांनी तात्काळ पूर्ण केली आहे. सदर पीपीई किट तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे या ठिकाणी पीपीई किट सुपूर्द करण्यात आले आहेत. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, वैभववाडी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक संताजी रावराणे, नायब तहसीलदार अशोक नाईक व कर्मचारी उपस्थित होते.