You are currently viewing राजेंद्र म्हापसेकर यांनी अखेर उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

राजेंद्र म्हापसेकर यांनी अखेर उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

सिंधुदुर्गनगरी

२६ मार्च रोजी जिल्हा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या राजेंद्र म्हापसेकर हे तब्बल एक महिन्यानंतर उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसले. बुधवारी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सभेच्या निमित्ताने त्यांनी दालनात हजर होत सभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. त्यामुळे म्हापसेकर यांची नाराजी दूर करण्यास भाजपच्या वरिष्ठाना यश आले आहे. भाजपसाठी हा एकप्रकारे दिलासाच मानला जात आहे.
२६ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक पार पडली होती. यावेळी डॉ अनिशा दळवी यांना सभापती पद दिल्याने उपाध्यक्ष म्हापसेकर नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी उपाध्यक्ष पदासह जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजिनामा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे दिला होता. त्यानंतर ३१ मार्च रोजी झालेल्या पशु संवर्धन, कृषि समितीच्या सभेला ते अनुपस्थित राहिले होते. यामुळे भाजपमध्ये मोठे रणकंदन माजले होते. भाजपमध्ये फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. विरोधकांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधत टिका केली होती.
भाजप श्रेष्ठिनी अनेकवेळा म्हापसेकर यांना राजिनामा मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, ते राजिनाम्यावर ठाम होते. आपण समाधानी आहोत, दुसऱ्या सदस्याला न्याय मिळावा, यासाठी आपला राजिनामा स्वीकारावा, असा आग्रह म्हापसेकर यानी वरिष्ठाकडे धरला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेला म्हापसेकर ऑनलाईन उपस्थित राहिले होते. त्यावेळी म्हापसेकर यानी दिलेला जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजिनामा मागे घेतल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे आता ते उपाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम राहतात की वरिष्ठाच्या विनंतिला मान देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर बुधवारी म्हापसेकर यानी उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसत उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा