ॲड.नकुल पार्सेकर
कोरोनाच्या भीषण महामारीने गेलं वर्षेभर घातलेला हैदोस, समाजातील प्रत्येक घटकांवर झालेले भीषण दुष्परिणाम, आर्थिक, सामाजिक आणि विकासाची पूर्णपणे विस्कटलेली घडी, अन्नासाठी आणि पाण्यासाठी मैलोनमैल करावी लागलेली वणवण, जगण्याची प्रत्येकाची धडपड आणि अशा या अभूतपूर्व परिस्थितीत नेहमी प्रमाणे आपण सगळ्यानीच अनुभवलेलं श्रेयवादाचं किळसवाणं गलीच्छ राजकारण, या सगळ्या घटनांनी २०२०या वर्षातील प्रत्येक दिवस गेला. असंख्य जवळची माणसं काळाने आपल्यापासून कायमची हिरावून नेली.
आपत्ती व्यवस्थापनासाठी हे फार मोठं आव्हान होतं. सरकारही हतबल आणि आरोग्य यंत्रणाही व्हेंटिलेटरवर. सार्वजनिक आरोग्य सेवेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या होत्या. गोरगरीब, शेतमजूर, कष्टकरी देशोधडीला लागले होते…सगळीकडे अंधारच अंधार. देशातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सरकारी यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून अहोरात्र झटत होते. पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आपल्या जीवावर उदार होवून कोव्हीड योध्दे बनून लढत होते. दुसऱ्या बाजूला काही खंडणीखोर, समाजकंटक या भीषण प्रसंगातही संधी शोधून अनेक सामाजिक समस्या निर्माण करत होते.
सरकार, सामाजिक संस्था यांच्या अथक प्रयत्नाने आपण कोरोनावर मात मिळवली…एवढ्या दुर्धर परिस्थितीतही कोरोनावर मात मिळवल्यावर बाधित सगळ्याचं घटकांना एक आशेचा किरण दिसला..नव्या जोमाने, नवी उर्जा घेऊन काही महिने थोड्याफार प्रमाणात गाडी रुळावर येण्याची चिन्ह दिसत असताना… अनपेक्षितपणे आता कोरोनाची जीवघेणी दुसरी लाट सुरु झाली. आता तर दिवशी होणारा देशभरातील गुणाकार हा लाखाच्या आकड्यात आहे. आपल्या महाराष्ट्रात तर परिस्थिती अतिशय बिकट आहे. वैद्यकीय सुविधा संपूर्णपणे कोलमडल्या असून आँक्सीजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन अभावी शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. एका बाजूला ही भीषण परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला राजकीय मंडळींचे आरोप-प्रत्यारोप यात सर्वसामान्य माणूस हवालदिल झालेला आहे.
ऐन व्यवसायाच्या मोसमात लाँकडाऊन जाहीर झाल्याने हातावर पोट असणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.यामुळे समाजातील प्रत्येक घटकं भरडला जात आहे. हे द्रुष्टचक्र कधी संपेल हे सांगता येत नाही. खाजगी नोकरीत असणाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात, विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान,विस्कटलेली आर्थिक घडी आणि पोटाची खळगी भरण्यासाठीची चिंता,हे सगळं भयाण चित्र असताना प्रत्येकाची अवस्था शिड फाटलेल्या जहाजाप्रमाणे झालेली असून त्याचा शेवट कसा असेल? हे सांगणे कठीण आहे…
समुपदेशन करतांना “BE POSITIVE”हे शब्द आपण सहजपणे उच्चारतो..पण जेव्हा आकाशच कोसळतं तेव्हा हा शाब्दिक आधार कुठल्याही कामी येत नाही…यावर आता उपाय एकचं प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून जबाबदारीने वागून आपलं आणि आपल्या कुटुंबियांच या महामारीपासून संरक्षण करणे. कोरोना गेला या भ्रमात राहून जो बेफिकिरपणा दाखवला गेला त्याचे गंभीर परिणाम आज आपण सगळेच भोगत आहोत.. या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे तरी आपण गांभीर्याने वागलं पाहिजे नपेक्षा फार मोठी किमंत आपल्याला मोजावी लागेल याचं भान आता सगळ्यांनीच ठेवण्याची नितांत गरज आहे….
…जान है तो जहान है!