You are currently viewing न्हावेली ग्रामपंचायत उदासीन

न्हावेली ग्रामपंचायत उदासीन

एकाचा मृत्यू तर एक कोरोना बाधित

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असताना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाकाठी कोरोनाने दहा बारा लोक मृत्युमुखी पडत असताना देखील गाव पातळीवर काही गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतींना परिस्थितीचे गांभीर्य राहिलेले नाही. संकट दारावर आल्यावर तरी अशा ग्रामपंचायतींनी त्यातून बोध घ्यावा आणि काही काळ तरी गावात सतर्क राहत संकटांशी लढण्यासाठी गाववाल्यांची प्रवृत्ती तयार करावी अन्यथा वेळ निघून गेलेली असेल आणि त्यावेळी काही केल्या संकट थोपविणे प्रशासनाच्या हाताबाहेर असेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना वाढत असतानाच सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायत मात्र सतर्कतेच्या बाबतीत कमालीची उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याधिकारी सिंधुदुर्ग के.मंजुलक्ष्मी यांनी लॉक डाऊन व संचारबंदी चे आदेश लागू केले आहेत. तरीही न्हावेली गावात ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम झालाच. त्यानंतरच्या काळात गावात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यानच्या काळात गावातील एक पॉझिटिव्ह रुग्ण दगावल्यानंतरही गावातील दुकाने ही रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायतीच्या वरदहस्ताखाली सुरूच असतात. गावात काल पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जागृत स्थानिक रहिवासी मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कमालीचे संतप्त बनले आहेत. तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे सदर प्रकारची तक्रार करून देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी पोलीस पाठवून सांस्कृतिक कार्यक्रम बंद करा असे सांगितले होते, परंतु त्यावर पोलीस प्रशासनाकडून देखील कारवाई करण्यात आली नाही.
जिल्ह्याला कोरोना विळखा घालत असताना गाव पातळीवर न्हावेली ग्रामपंचायतीची सुरू असलेली मनमानी म्हणजे भविष्यात गावाला संकटात लोटण्यासारखा प्रकार आहे. आजच सतर्क झाले नाहीत तर अडचणीच्यावेळी हेच तहसीलदार, आमदार, पोलीस प्रशासन गावाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतील तेव्हा मात्र गावाच्या मदतीला येणारा कोणीही नसेल. यासाठी आतापासूनच गावकरी मंडळींनी स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित रहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा