You are currently viewing कोरोनाचे सावट आणि जिल्हा रुग्णालय

कोरोनाचे सावट आणि जिल्हा रुग्णालय

परिस्थिती आणि गांभीर्य

विशेष संपादकीय

सर्च रिपोर्ट

कोरोना सोबतच जगावं लागेल अशीच काहीशी अवस्था गेले कित्येक महिने लोकांची झालेली होती. परंतु गेल्या महिनाभरापासून देशासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेला कोरोनाचा नवा अवतार हा मात्र कोरोनाच्या सोबत जगण्यासारखा नक्कीच नाही. सहज असं म्हणणारी मने देखील आतून बरीच धास्तावलेली आहेत, आणि याची प्रचिती येते ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची जीवन वाहिनी असणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती पाहिल्यावरच…!
जिल्हाभरातून जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने दिवसरात्र दाखल होणाऱ्या १०८ सह इतर ऍम्ब्युलन्स गाड्या आणि त्यातून कितीतरी धापा टाकत जिवाच्या आकांताने आपल्या गरजेच्या वस्तूंची पिशवी घेऊन उतरणारे रुग्ण पाहिल्यावर कोरोनाचे गांभीर्य पाहणाऱ्याच्या नजरेत दिसते. संपूर्ण रुग्णालय परिसरात कितीही गर्मी असली तरी तोंडावरून मास्क न हटविणारे रुग्ण आणि नातेवाईक, त्याच्या विरुद्ध बाजारपेठेत, रस्त्यावर विनामस्क फिरणारे लोक पाहिलेत की त्यांनाही एक दिवस जिल्हा रुग्णालय परिसरात जनसेवेसाठी सोडावे असंच मनात येतं. जिल्हा रुग्णालयात आपले प्राण वाचविण्यासाठी येणारा सर्वसामान्य रुग्ण जिल्हा रुग्णालयात आपल्यावर यशस्वी उपचार होतील याच आशेवर येत असतो. रुग्णालयातील कर्मचारी, नर्स, डॉक्टर देखील प्रयत्नांची शिकस्त करतात. परंतु रुग्णालय तेच, कर्मचारी वर्गही सिमीतच आणि वाढलेली आहे ती रुग्णसंख्या त्यामुळे बऱ्याचदा प्रत्येक रुग्णापर्यंत योग्यवेळी योग्य तो उपचार पोचणे कठीण होऊन जातं.
जिल्हा रुग्णालयात आपली कर्मचारी वर्गाशी चांगली ओळख असेल ते योग्य उपचार योग्य वेळेत मिळणे शक्य होतात. उपचार सर्वांवर केले जातात, परंतु रेमडेसीविर इंजेक्शनची कमी बऱ्याचदा मर्यादा आणते. ज्यांना खरोखरच रेमडेसीविर गरजेचे आहे त्यांना काहीवेळा त्यासाठी ताटकळत राहावे लागते, त्यामुळे रुग्णांवर पुढील आपत्ती येण्याची मुश्किली येते. काहींची ऑक्सिजन लेवल प्रमाणापेक्षा खाली गेल्याने त्यांचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णावर योग्यवेळी गरज असलेला उपचार सर्वच कर्मचाऱ्यांकडून प्रामाणिकपणे मिळाल्यास नक्कीच जिल्ह्यातील कोरोना मृत्युदर कमी होऊन आपला जिल्हा कोरोनावर विजय मिळवू शकेल.
मागील वर्षी आलेला कोरोना आणि यावेळीचा कोरोना खूपच फरक आहे. गेल्यावेळी कोरोनाचा माणसावर प्रभाव जास्त नव्हता, क्वचित प्रसंगी घातक सिद्ध व्हायचा, परंतु यावेळी आलेला कोरोनाचा अवतार काहीसा घातक दिसून येतो. मृत्यू होण्याचे प्रमाण देखील जास्तच आहे. काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यावर मृत्यू झाला की रुग्णांच्या नातेवाईकांवर डोंगर कोसळतो, परंतु कोरोनासारख्या घातक रोगाने मृत्यू झाल्यावर त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. पिशवीसदृश्य कपड्यात गुंडाळलेला मृतदेह स्ट्रेचर वरून कर्मचारी नेतात तेव्हा पाहणाऱ्यांचे हृदय पिळवटून येते, अशी वेळ कोणावर येऊ नये अशीच जो तो देवाकडे प्रार्थना करतो.
आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक स्वतः रुग्णसेवा करताना आढळून येतात. मागच्यावेळी नातेवाईकांना वॉर्डमध्ये प्रवेश नसायचा, परंतु वॉर्डमध्ये काय चाललंय याची कल्पना येत नसल्याने यावेळी नातेवाईक स्वतःच्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत वॉर्डमध्ये सेवा देतात. काही नातेवाईक स्वतःची काळजी देखील घेतात, परंतु कोरोना सोबत लढण्यासाठी तेवढी काळजी पुरेशी आहे का? रुग्णालयात नातेवाईक स्वतः जेवण देण्यापासून काहीजण भरविण्यापासून इतर कामे देखील करतात. त्यामुळे जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्णसंख्या वाढत तर नाही ना? असा संशय यायला वाव आहे. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा वावर मर्यादित झाल्यास नक्कीच जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा आकडा मर्यादित होईल. कारण हेच नातेवाईक घरी जाऊन घरातील व्यक्ती मध्ये मिसळतात, परिणामी कोरोनाचे संकट गडद होत जाते.
जिल्हा रुग्णालयातील इमरजेन्सी वॉर्ड सारखे काही वॉर्ड वगळता, ऍडमिट असलेल्या पेशंटच्या साखरेची पातळी वेळच्यावेळी तपासण्यात दिरंगाई होत आहे. काहीवेळा नातेवाईक रुग्णासाठी जेवण घेऊन येतात, त्याची कल्पना संबंधित कर्मचारी वर्गास देतात, परंतु काही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असले तरी काही असेही असतात जे दुपारी दोन वाजत आले अथवा रात्री नऊ वाजत आले तरी रुग्णांची साखरेची पातळी तपासून इन्सुलिन वेळेत देत नाहीत, त्यामुळे नातेवाईक विनाकारण तासभर वॉर्डमध्ये वावरत ताटकळत राहतात. सर्व कामे नक्कीच कर्मचारीवर्ग करतात परंतु काहीवेळा एखाद्या कर्मचाऱ्यांकडून चुकीची गोष्ट घडते आणि त्याचा दोष इतरांवर येतो. त्यामुळे रुग्णसेवा देणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांनी देखील मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून योग्यवेळी सेवा देणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांसोबत असलेला नातेवाईक जास्तवेळ वॉर्डमध्ये थांबणार नाही आणि त्याला कोविडचे संक्रमण होण्यापासून रोखता येईल.

जिल्हा रुग्णालयातील अनेक नर्स, ब्रदर, इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या घरी लहान मुलं, वयस्कर माणसे असताना देखील अतिशय उत्तम कार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या अस्पृहनिय कामासाठी त्यांना सलामच…!
डॉ.श्याम पाटील, डॉ. मसुरकर, डॉ.रिया महाजन, डॉ.अभिजित चितरी, डॉ.रुपेश जाधव आदी बरेच डॉक्टर आपापली सेवा योग्य रीतीने बजावत आहेत. जिल्हाधिकारी मॅडम देखील संपूर्ण लक्ष देऊन आहेत. आमदार वैभव नाईक जातिनिशी रोज जिल्हा रुग्णालयात येत आढावा घेत असतात, त्यामुळे एकंदरीत कारभार उत्तम सुरू आहे. परंतु परिस्थितीचे गांभीर्य आणि कोरोनाचा असलेला कहर त्याची दहशत ही मात्र घरात राहून किव्हा बाजारात फेरफटका मारून समजत नाही, त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती पाहणे गरजेचे आहे. कोरोना आहे आणि नक्कीच तो गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या तब्बेतीची काळजी घ्या, घरीच रहा, आणि सुरक्षित रहा. आपल्या कर्तव्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने स्वतःची योग्य ती खबरदारी घेऊनच बाहेर पडा आणि सुरक्षित घरी पोहचा.

प्रतिक्रिया व्यक्त करा