You are currently viewing ऑक्सिजनअभावी 4 रुग्णांचा मृत्यू? घटनेची चौकशी होणार

ऑक्सिजनअभावी 4 रुग्णांचा मृत्यू? घटनेची चौकशी होणार

ठाण्यातील वर्तकनगर येथील खाजगी वेदांता रुग्णालयातील  ऑक्सिजन अभावी 4  कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे.  मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी ही घटना उघडकीस आणली. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली असून ते या घटनेची माहिती घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी सहा सदस्यीय समितीकडून केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढंच नाहीतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीही सकाळी वेदांता रुग्णालयाला भेट दिली. तसेच या घटनेची शल्यचिकित्सकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान वेदांता रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक, मनसे आणि भाजपचे पदाधिकारी जमलेले असून पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज सकाळी ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हॉस्पिटल प्रशासन आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जमण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ऑक्सिजनअभावी झाला की, अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत अद्यापही रुग्णालय प्रशासनानं कोणतीही माहिती दिलेली नाही.

दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, रुग्णालयातील ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला होता.  परंतु रुग्णालय प्रशासनानं हे चारही रुग्ण क्रिटिकल होते असं सांगितलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला आहे. जर ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला असता, तर एकाचवेळी अनेक रुग्ण दगावले असले. त्या वॉर्डमध्ये एकूण 35 रुग्ण होते, असं सांगितलं आहे. तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं. परंतु, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी सहा सदस्यीस समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांचाही या समितीत समावेश असणार आहे. जे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा