सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर झूमॲपद्वारे ऑनलाईन पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यात त्यांनी सावंतवडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
ते म्हणाले की, आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात वॉर्ड ठरवून त्या प्रमाणे लसीकरण केले जाणार आहे. तसेच तालुक्यातील गावांची यादी करून त्या प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना बस सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तिन्ही तालुक्यांना प्रत्येकी दोन अशा सहा ॲम्बुलन्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार असून एक कार्डलोजी ॲम्बुलन्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी दिली.
कोरोना केअर सेंटर मध्ये ऑक्स मीटर, थर्मल गन, वाफ देण्याचे मशीन, पाणी गरम करण्याचे मशीन हे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेविका, आशा सेविका, इत्यादी सर्वांना पिपीई किट दिले जाणार आहे. तसेच रॅपिड टेस्ट किट साठी निधी देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांना व्हेंटिलेटर किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर जंतुनाशक फवारणीसाठी कोरोसेफ स्प्रे मशीन, बायो पॅक मशीन देखील उपलब्ध केली जाणार आहे. तसेच सरपंच यांना विमा मिळावा यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच उद्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत १६ बेडचे हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनंत पॅलेस येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.