चोरवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात…
बांदा
उद्या रविवारपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यात येताना ई-पास अत्यावश्यक करण्यात आला असून ज्यांच्याकडे प्रवासाचा परवाना नसेल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सटमटवाडी तपासणी नाक्यावर ई पास ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चोरवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यापासून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्यांना देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यासाठी नोकरदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकदा चाचणी केल्यानंतर त्याची मुदत पंधरा दिवस असणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे दररोज गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांना ई-पास काढणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर सटमटवाडी येथे थर्मल तपासणी नाक्यावर पोलिसांकडून गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनचालकांकडे ई-पास तपासण्यात येणार आहे. ई-पास नसल्यास त्या वाहनांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर तसेच जिल्ह्यात येणाऱ्या अन्य रस्त्यांवर उद्यापासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.