मुणगे
मुणगे आडवळवाडी येथे शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास वाघाने हल्ला करत एका वासरास ठार मारल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील महाजन कुटुंबियांच्या मालकीच्या पाच महिने वय असलेल्या गायीच्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला करून मृत्यूमुखी पाडले असल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री सर्व जनावरे महाजन यांच्या घरा नजीकच्या गोठ्यात बांधलेली होती. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मोठा आल्याने आवाजाच्या दिशेने कानोसा घेतला असता वाघ दृष्टीस पडला. त्यावेळी आरडा ओरडा केला असता बिबट्या जातीच्या वाघाने एका वासरास तोंडात पकडत पळ काढला. यानंतर गोठ्यात जाऊन पाहिले असता आणखी एक वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. जखमी पाच महिने वयाच्या वासरावर उपचार चालू करण्यात आले आहेत. दरम्यान या बिबट्या वाघाची दहशत या भागात असून यापूर्वी सुद्धा असून अनेक जनावरांचा फडशा पाडल्याच्या घटना येथे घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देवून बंदोबस्त करण्याची मागणी मुणगे ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.