खूर्च्यांसह पंखा व पाण्याचीही केली व्यवस्था
सावंतवाडी
निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावरच न थांबता यावेळी लसीकरणाच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रशासनामार्फत खुर्च्यांची व्यवस्था करुन दिली. तसेच बिसलरी पाणीही उपलब्ध करुन दिले.
त्यांच्या या कार्याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले. सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. लसीच्या तुटवड्यानंतर लस काही दिवसानंतर उपलब्ध झाल्यामुळे याठिकाणी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतही गुरुवारी या लसीकरणासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी दोनशे लस उपलब्ध झाल्याने सकाळपासून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या गावातील नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. याठिकाणी स्वॅब घेणे, दररोजची तपासणी, तसेच कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यामुळे एकीकडे कर्मचारी तुटवडा आणि त्यात तासनतास ग्रामस्थांना याठिकाणी उभे राहावे लागत आहे. बसण्यासाठी तेथे अपुऱ्या खुर्ची असल्याने ग्रामस्थ रस्त्यावर तसेच झाडाखाली उभे होते.
याबाबतची माहीती पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांना मिळताच त्यांनी प्राथमिक केंद्रात दाखल होत वैद्यकीय अधिकारी डाॅ.विक्रम मस्के यांची भेट घेतली. तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला फोन करुन याबाबत लक्ष वेधत रस्त्यावर तसेच रुग्णालय परिसरात उभ्या असणाऱ्या ग्रामस्थांना खुर्च्याची तसेच फॅनची व्यवस्था करा असे सांगितले. त्यानंतर याठिकाणी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून खुर्च्याची तसेच फॅनची व्यवस्था करुन देण्यात आली. तसेच सावंत यांनी स्वखर्चाने सर्वासाठी बिसलरी पाण्याची व्यवस्थाही केली.
यावेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर यांनीही सहकार्य दाखविले. याठिकाणी स्वॅब घेण्यासाठी आवश्यक असलेले ग्लासचे केबिन नसल्याचेही दिसुन आले त्यासंदर्भात सावंत यांनी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधले. यावेळी ग्रामस्थांनी येण्याजाण्यासाठी हे अंतर जास्त असल्याने तसेच गाडीची व्यवस्था नसल्याने नजिकच्या उपकेंद्रात लस देण्याबाबत सोय करण्याची मागणी सावंत याच्याकडे केली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असे सावंत यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याबाबत ग्रामस्थांनी सावंत यांनी दाखविलेल्या प्रेमाचे तोंडभरून कौतुक केले.