परशुराम उपरकर यांची मागणी….
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहे. तर कणकवली आणि कुडाळ येथे ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहेत. मात्र ऑक्सिजन प्लांटमध्ये समस्या निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त झालेला नाही. त्या कर्मचारी नियुक्ती तातडीने करा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
श्री.उपरकर म्हणाले, नाशिक येथील महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटला गळती लागून २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला. त्याच धर्तीवर इथल्या ऑक्सिजन प्लांटवर दुर्घटना घडू नये तसेच ऑक्सिजन प्लांटमध्ये काही बिघाड झाल्यास, तातडीने दुरुस्ती होण्यासाठी तांत्रिक कर्मचारी आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने तांत्रिक कर्मचार्याची नियुक्ती करायला हवी.
ते म्हणाले, वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालयाप्रमाणेच कुडाळ येथील महिला रूग्णालय आणि कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू केले जाणार आहेत. तशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र हे प्लांट सुरू होण्यापूर्वी तांत्रिक कर्मचार्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. नुसते प्लांट होऊन उपयोग नाही तर तेथे तांत्रिक कर्मचारी ही तेवढ्याच क्षमतेने दिवस-रात्र कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने व्हेंटिलेटर व्यवस्थाही ज्या रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणीही व्हेंटिलेटरची तांत्रिक देखभाल-दुरुस्ती करण्यासाठीची एजन्सी नेमणे आवश्यक आहे. प्लांट सुरू केले म्हणजे झाले नाही तर काही समस्या निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी तज्ज्ञ मंडळी त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.