बांदा
गेली वर्षभर कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन स्पर्धात्मक उक्रमांचे आयोजन शाळा पातळीवर करण्यात आले होते या स्पर्धात्मक उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजाधारक असलेला कर्णबधिर विद्यार्थी धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांने घरातून ऑनलाईन घेतलेला सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली वर्षभर शाळा लाॅकडाऊन असल्या तरी थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व विशेष दिन प्रसंगी बांदा केंद्रशाळा पातळीवर ऑनलाईन स्पर्धात्मक स्वरुपात उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्णबधिर असलेला धीरज पटेल हा विद्यार्थी आपल्या पालकांच्या मदतीने हिरीरीने सहभागी होत असे. यासाठी धीरजची आई अंजली पटेल व कुटुंबियांनी विशेष परिश्रम घेतले.
थोर व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी दिवशी धीरजने महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तींच्या वेशभूषा या दिवशी सादर करून या उपक्रमात सहभागी झाला होता.
तसेच या कालावधीत घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी रेखाटन, पर्यावरणपूरक राख्या तयार करणे, कापपासून वाती, वस्त्रहरण बनविणे, मातकाम, पाककला, चिमण्यांसाठी पाण्याची सोय करणे अशा शाळेमार्फत घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाआहे.
धीरजच्या या प्रतिसादाबद्दल बोलताना उपशिक्षक श्री जे.डी.पाटील यांनी म्हणाले पटेल कटुबियांनी आपला मुलगा कर्णबधिर असतानाही धीरजकडून स्पर्धात्मक स्वरुपात तयार करून घेऊन घेतलेला सहभाग वैशिष्ट्यपूर्ण असून त्याचा हा सहभाग आम्हालाही शाळापातळीर विविध उपक्रम ऑनलाईन स्वरूपात राबविण्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.