आरोग्य यंत्रणेशी संघर्ष नको : सहकार्य करण्याचे नागरिकांना केले आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत आढावा बैठक संपन्न
वैभववाडी
सद्यस्थिती तालुक्यात सक्रिय रुग्ण संख्या 226 इतकी आहे. ही संख्या कमी होण्यासाठी आरोग्य प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने सांघिक काम करा. तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये 104 बेडची क्षमता आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आणखी 50 बेड कोवीड सेंटरला देत असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी नागरिकांनी त्यांच्याशी विनाकारण संघर्ष करत बसू नये. त्यांना सहकार्य करावे. असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तहसील कार्यालयात संबंधित यंत्रणेकडून आढावा घेतला. यावेळी तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी अनिल पवार, भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, गट विकास अधिकारी शुभदा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, मुख्याधिकारी सुरज कांबळे, माजी सभापती दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, बाळा हरयाण, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, प्राची तावडे, आनंदा चव्हाण, मुकुंद शिनगारे, गणेश भोवड व पदाधिकारी उपस्थित होते.
दिगशीत कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली ही वस्तुस्थिती आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल आ. नितेश राणे यांनी कौतुक केले.
शहरात कोवीड केअर सेंटरसाठी 50 बेड तात्काळ उपलब्ध करतो. इतर लागणारी सुविधा आरोग्य प्रशासनाने उपलब्ध कराव्यात अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लसीचा तुटवडा असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्री पाटील यांच्याशी संपर्क साधला. 3000 डोस उपलब्ध असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. ते डोस संपल्याशिवाय नवीन मागवता येत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरिक लसीकरणासाठी स्वतः बाहेर येत आहेत. लस कधी येणार विचारत आहेत. सदर डोस वैभववाडीला द्या अशी मागणी आ. राणे यांनी जिल्हा यंत्रणेकडे केली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी मोफत धान्याची घोषणा केली आहे. परंतु अजून त्या धान्याचा पत्ता नाही. रिक्षावाले व इतर व्यावसायिकांना पॅकेज जाहीर केले आहे. त्यातीलही दमडीपण अजून आली नाही असे यावेळी सांगितले. यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करते. रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करते. नागरिकांनी त्यांच्याशी विनाकारण संघर्ष करत बसू नये. त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.