You are currently viewing शिरोडा -वेळागर भुमीपुत्रांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची घेतली भेट…

शिरोडा -वेळागर भुमीपुत्रांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची घेतली भेट…

वेंगुर्ला प्रतिनिधी
वेळागर येथील ज्या भूमीपुत्रांच्या मालकीच्या जमिनी पर्यटन विकासाच्या नावाखाली पंचतारांकित हॉटेल कंपनी ला देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विद्यमान महाराष्ट्र सरकारने ९० वर्षांचा जो नवीन करार केला आहे. त्याबद्दल भूमीपुत्रामध्ये पूर्ण नाराजीचे वातावरण आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपल्या समस्या व सरकारने दुर्लक्षित केलेल्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहचवून न्याय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याची भावना व्यक्त केली होती. त्याप्रमाणे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेळागर येथील लिंगेश्वर मंदिर येथे प्रत्यक्ष भेटून भूमीपुत्रांसोबत चर्चा केली.
यावेळी शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघाचे अध्यक्ष महादेव उर्फ भाई रेडकर तसेच खजिनदार जगन्नाथ डोंगरे, समितीचे सदस्य राजू आंदूरलेकर, विठ्ठल कांबळी यांनी सर्व्हे नं २९ ते ३६ तसेच सर्व्हे न ३९ आणि २१२ व २१३ मधील मालकीच्या जागा ज्या शासनाने करारा प्रमाणे ५४ हेक्टर मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत याचा न्यायालयीन लढा चालू असल्याने त्या वगळून इतर शासनाच्या ताब्यातील जमिनी मध्ये पंचतारांकित हॉटेल च्या माध्यमातून पर्यटन विकास करावा हीच मागणी या पूर्वी ही होती आणि यापुढे ही राहणार आहे. शासनाने स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्यांचा योग्य विचार करून यावर लवकर तोडगा काढावा व भूमिपुत्रांना न्याय द्यावा अशी भूमिका मांडली व तसे निवेदन वेळागर भूमी पुत्र संघा तर्फे तेली यांना देण्यात आले.
यावेळी राजन तेली यांनी भाजप हा कधीही विकास प्रकल्पाच्या विरोधात नसून पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत असेल व रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्ही अशा प्रकल्पाचे स्वागतच करू यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण असता नये परंतु विकासाच्या नावा खाली जर स्थानिक ग्रामस्थ किंवा भूमीपुत्रांवर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू व भूमिपुत्रां सोबत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करू अशी ग्वाही दिली.
यावेळी वेळागर येथील वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे व समिती सदस्यांची ही भेट घेऊन तेली यांनी सर्व्हे नं ३९ मधील जागा मालकांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या .
जि प सदस्य प्रितेश राऊळ यांनी ही स्थानिक भूमी पुत्रां वर अन्याय होऊ न देता त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या मागण्यांचा विचार करूनच शासनाने पंचतारांकित हॉटेल उभारावे अशी भूमिका मांडली.
यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, भाजप सिंधुदुर्ग सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, माजी सरपंच विजय पडवळ, भाजप शिरोडा उपाध्यक्ष संतोष अणसुरकर, तसेच शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघाचे पदाधिकारी व सभासद, वेळागर संघर्ष समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा