You are currently viewing मालवणात उद्यापासून विनाकारण फिरणे पडणार महागात…

मालवणात उद्यापासून विनाकारण फिरणे पडणार महागात…

शहरात फिरते कोरोना तपासणी केंद्र होणार कार्यरत ; तहसीलदार अजय पाटणे यांचे आदेश

मालवण

रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी मालवणात तहसीलदार अजय पाटणे यांच्या आदेशानुसार सोमवार पासून धडक कारवाई हाती घेण्यात येणार आहे. शहरात फिरते कोरोना तपासणी केंद्र सोमवारी १९ एप्रिल पासून कार्यान्वित केले जाणार असून विनाकारण फिरताना दिसल्यास ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची व कोरोना खबरदारी नियम मोडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजना अधिकाधिक पध्दतीने वाढवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर अन्य तालुक्यात राबवण्यात येणारी
ऑन दि स्पॉट कोरोना तपासणी मालवणातही सुरू करण्यात येणार आहे. तात्काळ रॅपिड टेस्ट केली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार आरटीपीसीआर टेस्टही केली जाईल. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मालवण भरडनाका, देऊळवाडा, तारकर्ली नाका, बाजारपेठ, कोळंब सागरी मार्ग, पिंपळपार, किनारपट्टी आदी व अन्य भागात फिरते कोरोना तपासणी केंद्र अचानक व्हिजिट करून तपासणी करणार आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य टीम काम करणार असून पोलीस व नगरपालिका यंत्रणाही सोबत असणार आहे. असे तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले.

वाढती रुग्णवाढ चिंता वाढवणारी : नगराध्यक्ष

मालवण शहर व परिसरात वाढती रुग्णासंख्या चिंता वाढवणारी आहे. खबरदारीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करावी. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट तात्काळ करून घ्यावी. होम आसुलेशन रुग्णांनी घरातील अन्य व्यक्तींशी संपर्क येणार नाही याची काळजी प्राधान्याने घ्यावी. आरोग्य विभाग व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा