ग्रामस्थांचा निर्णय; स्वतः पुढाकार घेणारे जिल्ह्यातील पहिलेच गाव…
सावंतवाडी
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता माजगाव गाव ८ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे.याबाबतचा ठराव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच दिनेश सावंत व पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी मांडला. दरम्यान पुढील धोरण ठरविण्यासाठी उद्या सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन श्री.सावंत यांनी केले आहे.
याबाबतची माहिती देताना श्री,सावंत म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिकरित्या गाव पातळीवर असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. दरम्यान आज झालेल्या सभेत काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या सरकारी कर्मचारी अधिकारी वगळता व अत्यावश्यक सेवेसाठी केवळ गावाबाहेर प्रवेश दिला जाणार आहे.विनाकारण फिरणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही खरेदीसाठी गावाबाहेर न जाता त्या ठिकाणीच्या दुकानात आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करावी,बाहेर जाणे टाळावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.