You are currently viewing डिस्चार्ज दिलेल्या कोविड रुग्णांना घरापर्यंत सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा..

डिस्चार्ज दिलेल्या कोविड रुग्णांना घरापर्यंत सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा..

कणकवली सभापती मनोज रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी; पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

कणकवली :

कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांना कोविड सेंटरपर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येते. मात्र, त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यावर त्याला घरापर्यंत सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था होत नसल्याचा मुद्दा कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत मांडला. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी याप्रश्नी गांभीर्याने दखल घेतली जाईल.

खनिकर्म विभागाकडून दोन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून त्यांच्यामार्फत ही व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन सभापती मनोज रावराणे यांना पालकमंत्र्यांनी दिले. कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांनाही हरकुळ बुद्रुक येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले जात असल्याचा मुद्दा रावराणे यांनी मांडला. याबाबत माहिती घ्या व कार्यवाही करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

मे महिनाजवळ आल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असून त्यांच्या कोविड टेस्टबाबत निर्णय घेण्याची मागणी रावराणे यांनी केली. आजच मी रेल्वेने मुबंई वरून आलो, मे महिन्यात नाही आजच प्रचंड प्रमाणात लोक मुंबईवरुन गावी येत असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी लवकरच निर्णय जाहीर करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोविड काळात ग्राम सनियंत्रण समित्या गेल्यावर्षी ज्याप्रमाणे ऍक्टिव्ह होत्या तशा सद्यस्थितीत नसल्याचा मुद्दा मनोज रावराणे यांनी उपस्थित केला. त्यावर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, या ग्रामसनियंत्रण समित्या लवकरच ऍक्टिव्ह होतील असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा