वैभववाडी
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस मांडला आहे. वैभववाडी तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंंगाने तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व अरुळे ग्रामपंचायतीने कोरोना संबधी कडक नियमावली बनवली आहे. गावच्या ग्रामस्थांसहीत परगावाहून गावात येणाऱ्यासाठी नियम घालून दिले आहेत. त्याच्या अंंमलबजावणीला सुरुवात देखील केली आहे.
काय आहेत हे नियम ?
सध्या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व अरुळे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी काही नियमावली ठरवून दिली आहे. ग्रामस्थांना वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर फिरता येणार नाही, गावात विनामास्क फिरणाऱ्यावर २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार, परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्यांची कोरोना तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. गावात येणाऱ्या अशा व्यक्तींची त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीला अगाऊ तीन दिवस कल्पना देण्यात यावी. या व्यक्तींचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना ग्रहविलगीकरण ठेवण्यात येणार. गावात बाहेरून येणाऱ्या कामगारांची तपासणी संबंधित ठेकेदाराने करणे बंधनकारक राहणार आहे.
गावाबाहेर व्यक्ती / पाहुणेमंडळी गावामध्ये वस्ती करू शकणार नाहीत. असे कडक नियम या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने गावात लावण्यात आले आहेत. भविष्यात लॉकडाऊन वाढल्यास
सनियंत्रण समितीच्या माध्यमातून गावामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातील.
कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढू नये तसेच कोरोनाला गावासहीत तालुक्यातून हद्दपार करण्यास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.