You are currently viewing मालवण तहसीलदारांनी आश्वासन देऊनही कारवाई नाही..

मालवण तहसीलदारांनी आश्वासन देऊनही कारवाई नाही..

मालवण :

रेवंडी खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून केलेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांनी खाडीपात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी या अतिक्रमणावर महसूल, वनविभाग व पतनविभाग यांच्या वतीने आठ दिवसात संयुक्त कारवाई करू, असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले होते. मात्र, आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रेवंडी खाडीपात्रात कांदळवृक्षांची यांची तोड करून तेथे जांबा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका रेवंडी गावाला बसण्याची भीती आहे. या अतिक्रमणाला विरोध दर्शवित ग्रामपंचायतीने तहसील प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर या अनधिकृत वृक्षतोडीची शासकीय पंचनामे झाले. त्यात कांदळवन व बंधारा तोडल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तरीही कारवाई होत नसल्याने आठ दिवसापूर्वी रेवंडी ग्रामस्थांनी थेट खाडीपात्रात उतरून आंदोलन छेडले होते. कांदळवन तोड हा गंभीर गुन्हा असताना वनविभाग कारवाई का करत नाही ? तसेच पतन विभागाच्या अखत्यारीत असलेला बंधारा तोडला तरी पतन विभाग गप्प का आहे? असे अनेक सवाल ग्रामस्थांनी केले होते.

त्यावेळी अतिक्रमणावर महसूल, वनविभाग,  पतनविभाग यांच्या वतीने संयुक्त कारवाईची ग्वाही तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली होती. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले होते. परंतु आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्यास तिन्ही कार्यालयाच्या समोर एकाच दिवशी उपोषण सुरू करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

दरम्यान या आंदोलनाला व आश्वासनाला आठ दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा