नितेश राणे यांची टीका : महाविकास आघाडीवर साधला निशाणा
मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यात १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून १ मेच्या सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या पोटी ५४७६ कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत मागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन” असं म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल” असं म्हणत नितेश यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.