वैभववाडी :
वैभववाडी तालुक्यातील दिगशी या गावात कोरोनाचे एकाच वेळी सुमारे ६० रुग्ण सापडल्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिगशी गावात आज तातडीने भेट दिली. दिगशीमध्ये कंटेनमेंट झोन करून वाडी सील करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या. त्याचप्रमाणे शिवसेनेतर्फे ५ थर्मल गन व २५ ऑक्सिमीटर दिगशी गावासाठी देण्यात आले.
दिगशी गावात १०० लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये सुमारे ६० जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. उर्वरित २०० जणांची टेस्ट उद्या पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा करून सद्यस्थितीची माहिती दिली.
याप्रसंगी वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार श्री. नाईक, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. जामसंडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा सचिव स्वप्नील धुरी, गोपाळ पाटील, रवी पाटील आदींसह प्रशाकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.