कुडाळ
वालावल व काळसे बागवाडी येथे अनधिकृतरित्या वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून या कर्ली खाडीच्या किनारी असलेल्या ग्रामस्थांच्या शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना वालावल ग्रामस्थांनी दिले आहे. या निवेदनावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करावी अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनधिकृत वाळू उपशाबाबत वालावलच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पंकज पेडणेकर यांनी धामापूर या ठिकाणी वाळू लिलाव घेतला आहे.
मात्र, हा ठेकेदार रात्रीच्या वेळी अनधिकृतरित्या बेसुमार वाळू उपसा करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवित आहे. पंकज पेडणेकर यांनी कर्ली खाडीतील एफ ६ या गटाच्या ठिकाणचे वाळू लिलाव घेतले आहेत. मात्र, लिलाव घेतलेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर येऊन अनधिकृत वाळू उत्खनन केले जात आहे.
याबाबत स्थानिक प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर पालकमंत्र्यांजवळ ग्रामस्थांनी निवेदन देऊन अनधिकृत होणारे वाळू उत्खनन रोखावे अशी विनंती केली. हे निवेदन दयानंद चौधरी, समीर चौधरी, आनंद चौधरी, लक्ष्मण चौधरी, गंगाराम चौधरी, गुरुनाथ कोचरेकर, गंगाराम कोचरेकर, सुहास वालावलकर, मीनानाथ कोचरेकर, महादेव देसाई, अमर चौधरी आदी ग्रामस्थांनी दिले.