सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
संपादकीय….
बांदा -दोडामार्ग राज्य मार्गावर गोव्याकडे होणारी बरीचशी वाहतूक आहेच, परंतु कळणे येथील खनिज प्रकल्पावर खनिज वाहतुकीसाठी होणारी डंपरची रोजचीच होणारी प्रचंड प्रमाणातील वाहतूक यामुळे रस्त्याची पार दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडून चाळण झालेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरणासाठी निविदा न काढता तात्पुरती मलमपट्टी केली.
बांदा दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्त्या लगतची झाडे हटविण्यासाठी तब्बल ५५ लाखांचा निधी खर्च केला जात आहे. रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक असताना खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी ती देखील ५५.०० लाख खर्च करून करणे म्हणजे अतिशयोक्ती आहे. प्रत्यक्षात मलमपट्टीचे काम देखील झालेले नसून संबंधित ठेकेदाराला ५५ लाखांपैकी २२.०० लाख अदा करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतोय.
सार्वजनिक बांधकाम चे शाखा अभियंता सांगतात ५५.०० लाख पैकी २२.००। लाख ठेकेदाराला अदा केले आहेत. परंतु संबंधित ठेकेदार सांगतात, आपले सार्वजनिक बांधकाम कडे १ कोटी येणे आहेत, फक्त ४.०० लाख अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांच्या पैशांचा होणारा दुरुपयोग पाहता नक्की विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभाराने बांदा दोडामार्ग रस्त्यावर प्रवास करणारे लोक भयंकर संताप व्यक्त करत असून ५५ लाख रुपये मलमपट्टीसाठी निधी मंजूर झाला आहे तर मलमपट्टी न करताच संबंधित ठेकेदाराला २२ लाख का अदा करण्यात आले, आणि तेवढीच मलमपट्टी ५५ लाखात होती तर उर्वरित ३३ लाख रुपये कोणाच्या घशात गेले? असे प्रश्न संबंधित रस्त्यावर ये जा करणारे उपस्थित करू लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम च्या अजब कारभारामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.