*एलसीपी चा आशीर्वाद*
मालवण:
मालवण तालुक्यातील बागायत येथील पेट्रोल पंपच्या समोर ठाकरांच्या छोट्या मोठ्या सहित परबांच्या मयग्याची अंदर बाहर जुगाराची बैठक गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या दिमाखात सुरू आहे. मीडियामध्ये बातमी येऊनही ठाकरांच्या छोटू मोटूची बैठक एलसीपीच्या आशीर्वादावर सुरू असल्याची खात्रीलायक बातमी आहे. पैशांच्या हव्यासापोटी खाकी वर्दीवाले देखील लोकांच्या जीविताशी खेळत असल्याचे दिसून आल्याने मालवण वासीयांमध्ये संताप पसरला आहे. जुगाराची बैठक सुरू असूनही सदरच्या विभागातील लोकप्रतिनिधी देखील मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सर्वच यंत्रणांवर संशयाची सुई जाते.
रस्त्यावर फिरणाऱ्या, घोळका करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना खाकी वर्दी आपला हिसका दाखवते तिथे मांडवली करून लॉकडाऊन मध्ये जुगाराच्या बैठका बसतातच कशा? बाजारपेठेत गर्दी होणार म्हणून अत्यावश्यक सामानाची दुकाने वगळून विक्रेत्यांना बंदी करण्यात येत आहे, सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी सुद्धा अडवणूक केली जाते, असे असताना शेकडो जुगाऱ्यांची गर्दी होणारी जुगाराची तकशीम चालवणाऱ्या छोट्या मोठ्या ठाकरांच्या आणि बाबांचो झिला परबांच्या मयग्याच्या जुगाराच्या बैठका कशा बसवू दिल्या जातात असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे.
सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणारे खाकी वर्दीवाले या बेकायदेशीर जुगाराच्या बैठकांना का पाठीशी घालतात? त्यातून खाकी वर्दीतील रखवालदारांना किती उत्पन्न मिळते? हा देखील संशोधनाचा विषय आहे, अन्यथा सर्वत्र निर्बंध असताना अशा जुगाराच्या बैठका झाल्याच नसत्या. जुगाराच्या या बादशहाना एलसीपीचा सपोर्ट आहे अशी बातमी असल्याने याची देखील चौकशी व्हायला हवी. लोकांच्या जीविताशी खेळण्यापेक्षा अशा बेकायदेशीर धंद्यांवर हातोडा मारणे हेच हिताचे होईल, अन्यथा सरकारने लॉकडाऊन करून कोरोनाचा प्रसार देखील रोखता येणार नाही.
बागायत परिसरातील लोकांमध्ये संताप पसरला असून त्यातून लोकच उठाव करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी बागायत व आजूबाजूच्या गावातील लोकांकडून करण्यात येत आहे.