विशेष संपादकीय….
खासदार नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या हृदयातील नेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी गेली जवळपास तीस वर्षे त्यांची नाळ घट्ट जुळलेली आहे. जिल्ह्यात सर्वच वर्गामध्ये त्यांचे चाहते आहेत. लहानथोर सर्वच आमचे दादा म्हणून त्यांना मान देतात. नारायण राणेंचा शब्द कित्येकांना आशेचा किरण दाखवतो, कारण नारायण राणे आपल्या शब्दाला कधीच पडू देत नाहीत. नारायण राणेंनी शब्द दिला म्हणजे काम होणारच, ही जिल्हावासीयांची भावना आहे. आपल्या जिल्ह्यातील जनतेच्या सुखदुःखात धावून जाणे, जिल्ह्यातील कोणीही रोगाने पीडित असेल, आर्थिक अडचणीत असेल किंवा अन्य कारणांनी दुःखी असेल तर त्यांना पहिला हात कोण देत असतील तर ते नारायण राणेच. गोरगरीब मुलांना शालेय सुविधा असो, आर्थिकदृष्ट्या मागास हुशार मुलांचा प्रवेश असो वा शिक्षणासाठी राहण्याची वा इतर सोय, राणेंच्या कोर्टात तो विषय गेला की सुटलाच अशी नारायण राणेंची काम करण्याची पद्धत आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून नारायण राणे यांनी पाहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जिल्ह्यात सुरू केले आणि मेडिकल कॉलेज देखील सुरू केले. भविष्यात जिल्हावासीयांना जिल्ह्यातच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
नारायण राणे हे जिल्ह्यातील एकमेव असे नेते आहेत, ज्यांचे केंद्रात वजन आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांना मानसन्मान आहे. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिल्ह्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी नारायण राणे यांना लवकरच केंद्रात जबाबदारी देण्याचे सूतोवाच केले होते. अमित शहा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, राणे जनतेसाठी काम करतात, त्यांची कामाची पद्धत वेगळी असली तरी त्यांचा उद्देश जनतेचे हित हाच असतो. नारायण राणेंवर जिल्ह्यातील जनतेचे असलेले प्रेम पाहून अमित शहा देखील भारावून गेले होते.
राजकारणातील बाप माणूस म्हणून ओळख असणारे नारायण राणे खूप महत्वाकांक्षी आहेत. हार मानणे त्यांच्या रक्तातच नाही. राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी चार पावले मागे जात जोरदार मुसंडी घेत जिल्ह्यावर ढिली झालेली आपली पकड पुन्हा एकदा मजबूत केली. साथ सोडून गेलेल्या शिलेदारांचे दुःख न बाळगता आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी जिल्हापरिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या व अजून नारायण राणे संपलेले नाहीत हे दाखवून दिले.
जिल्ह्यातील दबंग नेता अशी ओळख असणाऱ्या खासदार नारायण राणेंचा आज वाढदिवस. जनतेच्या सुखदुःखात नेहमीच सोबत असणाऱ्या जनतेच्या हृदयातील नेत्याला संवाद मिडियाकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी खूप सदिच्छा.