You are currently viewing निलेश राणे यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना…

निलेश राणे यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना…

कोवीड सेंटर 24 तासात सुरू करा

अन्यथा रस्त्यावर उतरून

रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. लांजा तालुक्यात तर आरोग्य सुविधेअभावी कोविड रुग्णांचे खूप हाल असून कोणतीच शासकीय यंत्रणा रुग्णांसाठी सुविधा देताना दिसत नाही. याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना लांजात तत्काळ आरोग्य सुविधांसह कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेन सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. अन्यथा रुग्णांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून हा जिल्हा प्रशासनासाठी इशारा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला किमान 100 पेक्षा अधिक होत आहे.

असे असताना आरोग्यासाठी पायाभूत सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात रुग्ण संख्या अधिक झाल्यामुळे रुग्णांसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. कोविड केअर सेंटर देखील अपुरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड आणि रत्नागिरी अशी फक्त 3 कोविड केअर सेंटर असून अन्य तालुक्यात कोणत्याही प्रकारे कोविड सेंटर उभारण्यात आले नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील तसेच गावांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी या रुग्णांना तेथिलच सुविधा असलेल्या कोविड सेंटरमध्ये भरती करून घेणे आवश्यक आहे. मात्र कोविड सेंटरच नसल्याने रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे असलेल्या सुविधांवर ताण येऊन अन्य रुग्णांवर त्याचा परिणाम होत आहे. लांजा तालुक्यातील पूर्वी असलेले कोविड सेंटर गेले अनेक महिने बंद असून तहसीलदार, प्रांत आणि तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करत आहे.

पुढील काळात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाने ही बाब हलकेपणाने घेतल्यास मोठी मनुष्यहानी होऊ शकते. याबाबत लांजा तालुक्यातील असंख्य रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी होत असलेल्या हालअपेष्टाबाबतीत माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या सर्व प्रकाराबाबत माजी खासदार भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधून लांजा तालुक्यात तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करावे आणि तेथील रुग्णांचे अन्य रुग्णालयात हलवताना होत असलेले हाल संपवावेत. याबाबत लागलीच आरोग्य विभागाला आणि तालुका स्तरावर निर्देश देण्यात यावेत अशी सूचना निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली असून रुग्णांचे सातत्याने हाल होत राहिले तर मात्र आक्रमक होऊन रुग्णांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावरही उतरू असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे.

लांजा तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजन देसाई यांनी कोविड केअर सेंटरसाठी निलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच राजन देसाई स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा