कणकवली
कोरोनाच्या फटक्यामुळे कणकवलीतील व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कणकवलीत व्यापाऱ्यांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला नेहमीच व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील. असे सांगतानाच सध्याचे हे मिनी नव्हे तर पूर्णच लॉकडाऊन आहे. असा आरोप व्यापाऱ्यांनी केला.
आम्ही शासनाचे कोरोना बाबतचे नियम पाळून सोमवार ते शुक्रवार दुकाने चालू ठेवतो. तसेच शनिवार व रविवारी आम्ही कडक लॉकडाऊन पाळतो,अशी भूमिकाही व्यापाऱ्यांनी बैठकीत मांडली.
त्यानंतर नगरपंचायत व पोलीस विभागाकडून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसारच मिनी लॉकडाऊन बाबत कार्यवाही होईल,असे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री यांची भेट घेऊन आपल्या भावना त्यांच्याकडे मांडण्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी जाहीर केले.
कणकवली नगरपंचायत व व्यापारी यांची संयुक्त बैठक मंगळवारी नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात झाली.या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे,पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर, माजी अध्यक्ष विशाल कामत, राजू पारकर,विलास कोरगावकर,नगरसेवक अभिजीत मुसळे,सुजित जाधव,राजेश राजाध्यक्ष, अण्णा कोदे, नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर,चंद्रशेखर चव्हाण, महेश देसाई,मंगेश तळगावकर, अण्णा काणेकर,सुशील पारकर,बाळा तावडे,संतोष काकडे,शेखर गणपत्ये,योगेश ताम्हाणेकर, रिक्षा व्यावसायिक बाबाजी वराडकर,संतोष पुजारे आदीसह शहरातील व्यापारी उपस्थित होते.
यावेळी समीर नलावडे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांचे मिनी लोकडाऊनबाबत आदेश जारी झाले आहेत.सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवा चालू राहतील. तसेच शनिवारी व रविवारी पूर्णतः बंद असेल. किराणा,भाजी,दूध,मिठाई,रेल्वे,टॅक्सी,रिक्षा,एसटी,वृत्तपत्र चालू राहतील.
पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला म्हणाले,हे मिनी लॉकडाऊन आहे,शासनाचे धोरण येईल,त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत.शासनाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही काम करणार आहोत.कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी हा प्रयत्न आहे.सामान्य माणसाला त्रास पोलिसांकडून होणार नाही. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी आहे.रात्री नागरिकांनी विनाकारण फिरायचे नाही.दिवसा ५ माणसापेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये.सोमवार ते शुक्रवारी जमावबंदी तर शनिवारी,रविवारी पूर्ण संचारबंदी आहे.दुकानात सोशल डिस्टन्स पाळावेच लागेल.कुरियर सेवा अत्यावश्यक मध्ये येत आहे.
नगरपंचायततर्फे सर्व सार्वजनिक सेवा सुरु राहतील.शेती विषयक साहित्य विक्री दुकाने चालू राहतील. शासन आदेशानुसार आम्ही काम करु, व्यापाऱ्यांनी लसीकरण व आर्टिपीसीआर टेस्ट करून घ्यावी. अनिल अणावकर म्हणाले ,आम्ही घरी जाऊन सेवा देवू शकतो का ? कारण आमची सलून बंद राहिली तर आर्थिक संकट आमच्यावर कोसळणार आहे. आमची मुले आहेत .त्यांचे शिक्षण आहे. त्याचे काय करायचे?
राजू पारकर म्हणाले,आता इमारतींची बांधकामे सुरु आहेत. मग हार्डवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक दुकान बंद केले तर संबंधितांनी काय करायचे? कापड दुकाने बंद केली आहेत,आणि लग्न सोहळे चालू आहेत.मग संबंधितांनी कपडे कोठे खरेदी करायचे ? नगरसेवक अभिजित मुसळे म्हणाले,हे मिनी लॉकडाऊन आहे की लॉकडाऊन?सगळं बंद आहे,मग त्याचा उपयोग काय?आमच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवा. यावेळी व्यापाऱ्यांनी अनेक मुद्दे मांडले. कणकवली शहरातील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याच्या मुद्द्यांवर एकमत झाले.