वाई (जि. सातारा)
पहाट हाेण्यापुर्वीच ग्रामस्थ साेमेश्वर मंदिराजवळ जमले. “काशिनाथाच्या नावानं चांगभलं’ चा गजर सुरु झाला. बगाड्याला आणण्यात आले अवघ्या काही सेकंदात त्यास लाटेवर (झोपाळ्यावर) चढविण्यात आले. सूर्य उगवताेच ताेच बगाडाच्या चहूबाजूंनी हजारो भाविकांच्या उपस्थिती हाेती. त्यानंतर मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ झाला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रेवर प्रतिबंध घातल्याने बगाड मिरवणुक निघणार नाही अशी शक्यता असतानाच गावक-यांनी गनिमी काव्याने काढलेली मिरवणुक देश-विदेशात साेशल मिडीयाच्या माध्यमातून पाेचली. दरम्यान हजाराेंच्या संख्येत आलेल्या भाविकांपुढे बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या नग्णय ठरली.
बहुतांश भाविकांनी सुरक्षिततेसाठी तोंडावर मास्क लावला होता असेही चित्र पाहयला मिळाले.
वाई तालुक्यात बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. येथील भैरवनाथाच्या यात्रेसाठी होळी पौर्णिमेच्या रात्री मंदिरामध्ये बगाड्या ठरविण्यात येतो. या वेळी संचारबंदीमुळे बगाड्याची निवड झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे यात्रेबाबत साशंकता निर्माण झाली हाेती. परंतु आज पहाटेच बगाडयाला झाेपाळ्यावर चढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. गतवर्षी पाेलिसांनी बगाड मिरवणुक काढल्याने यात्रा समितीवर गुन्हा दाखल हाेतेा. यंदा यात्रा समितीच ठरविण्यात आली नाही. त्यामुळे यात्रेचे नियाेजन काेण आणि कसे करीत आहे हे काेणालाच समजत नव्हते. हाेळीच्या रात्री काैल लावण्यात आला. बगाड्याची निवड करुन त्याला गावाच्या बाहेरील देवळात लपवून ठेवण्यात आले हाेते अशी चर्चा परिसरात हाेती.
बावधनच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा तीरावरील सोनेश्वर येथे पहाटेच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्यास नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाडाच्या झोपाळ्यावर चढविण्यात आले. या वेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे 30 ते 40 फुटांच्या उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात आले. बैलजोड्यांच्या साह्याने हा रथ ओढण्यात येत होता.
गाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभित करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. या वेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या. एरवी
दुपारच्या वेळेस पाेचणारे बगाड आज नऊ साडे नऊलाच गावात मंदिराजवळ पोचले. तेव्हा पारंपारिक वाद्यांचा गजर करण्यात आला. दर वर्षी बगाड पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. दिवसभरात जिल्हा व राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड पाहण्यासाठी आवर्जून येतात. यावर्षी बगाडाबाबत साशंकता निर्माण झाल्याने परिसरातील वाडीवस्तीवरील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरम्यान बगाड निघाल्यानंतर त्याचे व्हिडिआे राज्यात साेशल मिडियाच्या माध्यमातून पाेचले. यंदा देखील बगाड मिरवणुकीस माेठी गर्दी झाल्याने प्रशासनावर टीकेची झाेड उठली. यंदा यात्रा समिती नसल्याने पाेलिसांची नेमकी काय भुमिका राहणार याचे लक्ष लागून राहिले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पाेलिस त्यांनी केलेल्या व्हिडिआे चित्रणातून ग्रामस्थांची आेळख पटवून त्यांना ताब्यात घेत हाेते. अद्याप पुढील कार्यावाही सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.