चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक. मुस्लिम बांधव देखील या देवीचे मानकरी आहेत. सय्यद बांधव यांच्याकडे देवीचा मान आहे.
रत्नागिरी
कोकण म्हणजे महाराष्ट्राच एक मुकुटच. या मुकुटाचा एक रत्न म्हणजे रत्नागिरी जिल्हा. या जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक. सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्ग रमणीय परिसरात कौलारु मंदिरात श्री सुखाई, वरदायिनी, महाकाली असून तिथे मंदिर दोन वास्तूत विभागले आहे. मुख्य वास्तूमध्ये सुखाई आणि वरदायिनी तसेच शेजारच्या वास्तूमध्ये श्री आई महाकाली आहे. वरील नमूद केलेली सर्व विश्रांती स्थाने ही प्रतिकात्मक आहेत. त्यांच्या ठिकाणी परंपरेनुसार रुपी लावणे आणि वार्षिक उत्सव साजरे केले जातात.
कुंभार्ली हे स्थान शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावचे मुख्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आई महाकालीने आपले सर्व अधिकार सुखाई आणि वरदायिनी या दोन लहान बहिणींना बहाल केलेले आहेत. म्हणूनच प्रथम दर्शन या दोन बहिणीचे घेतल्यानंतर महाकालीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. तीन भावांनी दीर्घकाळ गुण्यागोविंदाने नांदावे त्यांच्यातील एकी आदर्श ठरावी अशा पद्धतीने चिपळूण तालुक्यातील शिरगाव कुंभार्ली पोफळी ही तीन गावे एका कुटूंबाप्रमाणे नांदत आहेत. शके 1209 सालापासून शिरगावकडे मोठ्या भावाची तर कुंभार्ली, पोफळी यांच्याकडे धाकट्या भावाची भूमिका आहे. या तीन गावचे देवस्थान सुकाई, वरदायिनी, महाकाली या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद आहे.फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला महाकाली देवीची यात्रा दरवर्षी भरते. या यात्रेत सर्व समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी असते, त्यामुळे स्वाभाविकच एकोपा असतो. शिरगाव हा मोठा भाऊ म्हणजे शिंदे त्यानंतर कुंभार्लीचे कोलगे ,पोफळीचे पवार आणि सय्यद बांधव मानकरी आहेत. या तीन गावचे देवस्थान महाकाली येथील लोकव्यवहार आणि संस्कृती हिंदू-मुस्लिम धर्मियांना एकत्रित बांधणारी आहे. नवल वाटावी अशी गोष्ट म्हणजे गावच्या लोकरहाटीत हिंदूंसोबत सय्यद बांधव यांनासुद्धा सारखेच स्थान आहे. याठिकाणी अठरा कुंभाचे मानकरी आहेत आणि त्या प्रत्येक जातीला मान आणि स्थान आहे हे शके 1209 सालापासून सुरु आहे.यात्रेला सुरुवात महाशिवरात्रीला लाट तोडून होते. आणि तेथूनच शिंमग्याला सुरुवात होते. पोफळीचे मानकर घराणे शिरगावमध्ये म्हणजे मोठ्या भावाकडे जातात आणि लाट तोडली जाते तिन्ही भाऊ ( गावे ) लाटेचा मान असेल तेथे जातात आणि लाट तोडली जाते. दुसऱ्या दिवशी महाकाली मंदिराकडे लाट वाजत गाजत आणली जाते. लाट मंदिरात आणण्याचा मान शिरगावचा असतो. यावेळीही सय्यद बांधव सामील असतात. लाटेसाठी बांबूचे खांब,शिडी कोणी बनवयाच्या?, लाट चढविण्यासाठी वासे कोणी काढायचे? हे सारे प्रथेनुसार ठरविले आहे.देवीची रूपे पोफळी येथील मानकर घराण्याकडे असतात. यात्रेत लाटेला पाच घाव घालण्याचा मान मानकर घराण्याचा आहे. इथून यात्रेला सुरुवात होते. यात्रेदिवशी बगाड बांधण्याचा मान देखील मानकर घराण्याचा आहे. यात्रेदिवशी देवीचा मंदीरातील गाभाऱ्यात विड्यांचा मांड भरला जातो. या मांडाची विधीवत पूजाअर्चा केली जाते. त्यावेळी यावर्षीच्या मानकरीला तीथे बसवून मांडलेल्या पान विड्यांची पूजा केली जाते. मानकरांच्या उपस्थितीत मंदीराला ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. नंतर पुन्हां मंदिराच्या समोर येऊन देवीचे दर्शन घेत मंदीराच्या समोर असलेल्या खुल्या मैदानावर असलेल्या बगाडाला पाच प्रदक्षिणा मारतात. या प्रदक्षिणा मारताना बगाडातील लाटेची दोरी मानकरींच्यासोबत गोल फिरवली जाते. पाच प्रदक्षिणा घालून झाल्यावर तिनगावचे मानकरी व सर्व ग्रामस्थ मंदीरात जाऊन देवीला सामुदायिक आराज लावतात. नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर मांडलेल्या विड्यांचा मांड, प्रसाद तीन गावातील मानकरींचा मान म्हणून प्रत्येकाला त्यातील एक एक विडा वाटला जातो. त्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमाला सुरुवात होते.देवी महाकालीच्या यात्रेअगोदर 15 दिवस अगोदर आकुसखा बाबांचा उर्स भरतो तेथे सर्व धर्मीय जातात हिंदू धर्मियांची परंपरागत शेरणीही तेथे असते. अशा तऱ्हेने वर्षानुवर्षे अंत्यत सहज भावाने लोक गुण्यागोविंदाने येथे नांदत आहेत.मुस्लिम बांधवांच्या ईद, मोहरम या सणात हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेली अनेकवर्षे या तीन गावांत आतुट नाते पहावयास मिळत असून तीन गावे एका कुटूंबाप्रमाणे नांदत आहेत. या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद म्हणजे नवसाला पावणारी आई महाकाली देवी. यात्रेसाठी खास मुंबईहुन उत्कृष्ट फुलांची सजावट मंदिरात केली जाते.येथे संमिश्र संस्कृती कशी नांदते याचा पडताळा या काव्यातून येतोमाळेच्या गुरू बहिणी!माळेला कवड्या चार!..तिच्या भेटीला आला पीर!!…महाकाली देवीच्या नावाचा गजर आखाती देशात म्हणजेच साता समुद्रापलिकडे होऊ लागला आहे. माझी आई महाकाली देवी नवसाला पावणारी असल्याचं इथले भाविक सांगतात. शिमगोत्सवहि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी पालखी शृंगारते शिरगावच्या सहाणेवर वार्षिक बैठक होते व वर्षभराचे नियोजन तीन गावच्या संमतीने होते.तीन बहिणींच्या ओटी भरल्यानंतर सुहासिनीला एक ओटी परत दिली जाते म्हणजेच सुहासिनीची ओटी भरली जाते. या मंदिरातील दरवाजे रात्रंदिवस देवीचे मंदिर उघडे असते. जागृत देवस्थान असलेल्या महाकाली देवीच्या अस्तित्वाचा प्रत्यय अनेकांना आला आहे.शिरगाव कुंभार्ली पोफळी या तीन गावाची ही देवी या देवीचे वर्षभरातील सारे उत्सव अत्यंत आनंदाने, शांततेत आणि भक्तिभावाने साजरे होतात. तीन गावाची कमिटी आणि तीन गावातील ग्रामस्थ अगदी भक्ती भावाने सर्व उत्सव साजरे करतात. मुस्लिम बांधव देखील या देवीचे मानकरी आहेत. सय्यद बांधव यांच्याकडे देवीचा मान आहे. शिंदे, कोलगे, पवार, सय्यद, मानकर, शेट्ये, गुरव, लाड, लांबे, काजवे, रहाटे, बेकर, म्हात्रे, लाखणं, सुवार, सुतार, महाजन आणि नाभिक ही सारी मंडळी उत्साहाने उत्साहात सहभागी होतात.