कोरोनाचे नियम पाळत साधेपणाने परंपरा जपत केली सुरुवात
सावंतवाडी
मळगाव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ गावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत मळगाव गावची पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास साधेपणाने सुरुवात झाली. असंख्य वर्षांची ही अनोखी परंपरा मळगाव गाव एकोप्याने जपत आले आहे. सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ, गावकर (मानकरी) सवाद्य वाजत गाजत येथील सुवार्डा डोंगरावर गेले. तिथे गेल्यावर होळीसाठी लागणाऱ्या झाडाची विधिवत पूजा करून होळीला सजवून सुवार्डा डोंगराच्या शिखरावर असलेल्या दगडावर गावची पहिली होळी उभारण्यात आली. होळी उभारल्यावर होळीसमोर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सामूहिक गाहाणे घालण्यात आले. गाऱ्हाणे झाल्यावर पेढा व प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करण्यात आले. सुवार्डा डोंगरावरील कार्यक्रम आटोपल्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मायापूर्वचारी मंदिर परिसरात होळी उभारण्यात आली. सायंकाळी मळगाव गावची मानाची होळी मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरासमोर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील वाडी-वाडीत कोरोना नियमावलीचे पालन करून होळ्या उभारण्यात येणार आहेत. मळगावचा शिमगोत्सव सात दिवसांचा साजरा करण्यात येणार आहे.