*राणे-भाजपमध्ये मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत नाही*
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवरून नाराज असलेले भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, व कासार्डे मतदारसंघाचे जि.प. सदस्य संजय देसाई यांनी राजीनामा दिला. भाजपचे हे जि.प. सदस्य निष्ठावंत असूनही त्यांना पदे नाकारून केवळ एक सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली. नारायण राणेंच्या दृष्टीने राजेंद्र म्हापसेकर, संजय देसाई व भाजपच्या इतर मूळ सदस्यांची कुवत नसल्याने त्यांना पदे नाकारून इतरांना संधी देण्यात आली. त्यामुळे राणे-भाजपमध्ये मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत नाही. हे राणे कुटूंबियांनी दाखवून दिले आहे. अशी भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांची कानउघडणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे.
संदेश पारकर पुढे म्हणाले, माझ्या अनुभवानुसार नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा वापर केवळ आणि केवळ कुटूंबियांच्या फायद्यासाठी त्यांनी करून घेतला. मूळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही अशाच प्रकारे राणे वापर करून घेत आहेत. राजेंद्र म्हापसेकर, संजय देसाई यांनी पक्षासाठी दिलेले योगदान राणेंनी क्षणार्धात विसरून आपल्याच समर्थकांना पदे मिळवून दिली. सिंधुदुर्ग मधील मूळ भाजप हि राणे-भाजप होत आहे असे विधान याअगोदर आपण केले होते. ते विधान सत्य होताना दिसत आहे. राणे समर्थकांच्या भाजप पक्षातील हस्तक्षेपामुळे भाजपचे मूळ निष्ठावंत कार्यकर्ते दूर फेकले जात आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही राणेंनी भाजपच्या मूळ सदस्यांना संधी देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी भाजपच्या मूळ निष्ठावंत जि. प.सदस्यांना नाकारून आपल्या मर्जीतील लोकांनाच आतापर्यंत बढती दिली. म्हणून आज भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मात्र राणे-भाजपची जि. प. वरील मक्तेदारी आता पुढील सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत मोडीत काढून जिल्हा परिषेदेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार आहोत. असा ठाम विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.