You are currently viewing शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया

कुडाळ

” शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे .आणि शाळा नावाच्या मंदिरामध्ये दिल्या गेलेले शिक्षण हे सरस्वती गणपतीच्या आराधने सारखं श्रेष्ठ असतं.या शिक्षण मंदिरात मुख्याध्यापक हे  आधारस्तंभ असतात. संपूर्ण शाळेची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे असते. म्हणून शाळा चालवण्यासाठी जी विविध कौशल्य आत्मसात करावी लागतात त्याची माहिती शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होते “असे उद्गार डॉ. दीपाली काजरेकर यांनी काढले. त्या बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या यशस्वी उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “शालेय व्यवस्थापन ही मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी आव्हानात्मक बाब असून त्या बद्दलचे ज्ञान ही काळाची गरज आहे.असे सांगत शालेय व्यवस्थापनामध्ये असणार्‍या विविध अडचणी व त्यावर कशी मात करता येते .याचे विवेचन करत उत्तम गुण प्राप्त केलेल्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य परेश धावडे,प्रा. अरुण मर्गज ,सौ .जयवंती परब-सावंत, ,प्रा. नितीन बांबर्डेकर  इत्यादी उपस्थित होत.

दीपप्रज्ज्वलनाने सुरू झालेल्या या  कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय विचार व्यक्त करताना उमेश गाळवणकर म्हणाले “कोणतेही काम करताना त्या कामावर नितांत श्रद्धा असावी व त्यासाठी कष्ट घेणे आवश्यक असते. शिक्षकी पेशा त्याला अपवाद नाही.शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमात याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. संस्था जे अभ्यासक्रम सुरू करते ते सुरळीतपणे चालू ठेवण्याचे काम हे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यानी करणे आवश्यक असते, आणि बी.एड कॉलेजच्या प्राचार्य व समन्वयकांनी ही आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे ‌.असे सांगत उत्तम गुण संपादन केलेल्या शिक्षकांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

कुडाळ येथील बॅ. नाथ पै बी.एड. कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम आणि   एम .ए. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या शिक्षण क्रमामध्ये यशस्वी झालेल्या शिक्षकांचा सत्कार व नवीन प्रवेश घेतलेल्या शिक्षकांचे स्वागत  समारंभ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकताच आयोजित केला होता.

यातील शालेय व्यवस्थापन पदविका संपादन करत असताना प्रथम क्रमांक श्री विवेकानंद बालम, द्वितीय क्रमांक श्री राजेंद्र नारकर, व तृतीय क्रमांक श्री दत्तप्रसाद खानोलकर यांनी प्राप्त केला, तर एम ए शिक्षण शास्त्र विभागातून श्री महेश गावडे प्रथम, श्री अनिकेत सावंत द्वितीय,तर भावना मोटघरे- वाघेला यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या  सर्वांचा संस्था व महाविद्यालयातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात  आले.तसेच एम. ए. एज्युकेशन ची विद्यार्थिनी सौ.भावना मोटघरे -वाघेला यांनी कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवरून ५० लाख रुपये पर्यंत बक्षीस मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या वतीने  राजेंद्र नारकर, श्री विवेकानंद बालम व सौ .भावना मोटघरे -वाघेला,महेश गावडे, अनिकेत सावंत,  व इतर अनेक मान्यवरानी मनोगत व्यक्त करीत संस्थेने ‘उत्तमपणे चालवलेल्या या एज्युकेशन कोर्स बद्दल , उत्तम व्यवस्थापनाबद्दल, संस्थाचालक व  मार्गदर्शक प्राध्यापक यांचे कौतुक करीत महाविद्यालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा