कणकवली
वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना “हनी गिफ्ट” देऊन आपली अवैध कामे सिलिका माफिया करून घेत असल्याचा खळबळजनक आरोप मनसे सरचिटणीस उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ”हनी गिफ्ट” सोबत जीवाचा गोवा करून ”ते” अधिकारी सिलिका माफियांना सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचेही उपरकर म्हणाले. मागील रविवारी कासार्डे तील बेकायदा उत्खनन करणारे सिलिका माफिया आणि जिल्ह्याचा वरिष्ठ महसूल अधिकारी पाली येथे सेटलमेंट साठी गेल्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील 4 वरिष्ठ अधिकारी कधी सावंतवाडीत, कधी कुडाळ मध्ये हॉटेलात बसून मायनींग बाबतची व्यूहरचना करतात. जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत निलंबित झालेले नायब तहसीलदार राठोड हेच सिलिका खाणींची पाहणी पथकाचे प्रमुख आहेत. नायब तहसीलदार राठोड यांच्या आशीर्वादानेच सध्या कासार्डेत अवैध सिलिका उत्खनन सुरू आहे. अवैध सिलिका खाणींची मोजमापे घेताना काहींना नायब तहासिलदार राठोड यांनी सॉफ्ट कॉर्नर दिल्याचा आरोप उपरकर यांनी केला. राठोड यांनी केलेल्या अवैध सिलिका खाणींच्या चौकशीची फेरचौकशी करण्याची मागणी उपरकर यांनी केली. कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या अवैध सिलिका दंडात्मक कारवाईची अपील तातडीने फायनल करावीत अशी मागणीही उपरकर यांनी केली. खासदार राऊत यांच्या वाढदिवसानंतर एकमेकांवर गुन्हे दाखल करणारे भाजपा-शिवसेना कार्यकर्ते अचानक गप्प का बसले ? सेना-भाजपाच्या दिखाऊपणाचा मनसे कायम पोलखोल करणार असा इशाराही उपरकर यांनी दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.