वेंगुर्ला
तीन काळे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज पुरकरलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणून वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यानी शेतक-यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्याचा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला होता. या आदेशानुसार वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेकी भाजप हटाओ, देश बचाओ… भाजप सरकार चाले जाओ.. भाजप हटाओ, कामगार बचाओ च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, प्रांतिक कमिटी पदाधिकारी हिरोजी उर्फ दादा परब, शहर अध्यक्ष प्रकाश डीचोलकर, वेंगुर्ला पं. स. उपसभापती सिद्धेश परब, जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, पं. स. सदस्य साक्षी कुबल, महिला शहर अध्यक्ष कृतिका कुबल, नगरसेवक आत्माराम सोकटे, नगरसेविका स्नेहल खोबरेकर, जगन्नाथ डोंगरे, कुंदा पै, समीर नागवेकर, अंकुश मलबारी, सागर नांदोसकर, रमाकांत दाभोलकर, अल्ताफ शेख, युवक काँग्रेसचे प्रणव गावडे, विजय खाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विधाता सावंत म्हणाले की, या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात लढाई ही फक्त शेतकऱ्यांची राहिलेली नसून ती आता सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. मोदी सरकारने देश विकायला काढलेला असून येणाऱ्या काळात कोकणातील समुद्र किनारे सुद्धा मोदी सरकार विकतील. आज देशात होणार आंदोलन हळूहळू कोकणात येणार आहे. त्यामुळे या कारणांसाठी येत्या २०२४ ला मोदी सरकारला देशातून हद्दपार करू असेही श्री सावंत ते म्हणाले.
तसेच यावेळी जेष्ठ महिला पदाधिकारी कुंदा पै यांनी भाजप सरकारने उज्वला गॅस योजनेत फसवणूक करून तसेच महागाई वाढवुन महिलांचे हाल केले असल्याचा आरोप केला. तर काँग्रेस सरकार असताना युवकांकडे रोजगार होता. मात्र, या भाजप सरकारने युवकांना बेरोजगार करण्याचे काम केलं असल्याचा आरोप यावेळी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांनी केला.