You are currently viewing मुंबईत आहेत १० प्रसिध्द संग्रहालये…

मुंबईत आहेत १० प्रसिध्द संग्रहालये…

मुंबई

भारताला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक राजे, शूर योद्ध्यांनी या वीरभूमीमध्ये जन्म घेतला आहे. त्यामुळे भारतीय इतिहासातील प्रत्येक गोष्ट जतन करण्यासारखी आहे. भारतात अनेक वस्तू संग्रहालये असून यात अनेक ऐतिहासिक गोष्टींचं जतन करण्यात आलं आहे. या संग्रहालयांच्या माध्यमातून शिल्प, प्राचीन, इतिहास आणि संस्कृती अशा असंख्य गोष्टीचा वारसा सांभाळता येतो. देशात अनेक शहरांमध्ये वस्तू संग्रहालये असून यातील काही संग्रहालये मुंबईतदेखील असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे मुंबईत एक-दोन नव्हे तर चक्क १० संग्रहालये आहेत. त्यामुळे ही संग्रहालये कोणती ते जाणून घेऊयात.

१. मणिभवन संग्रहालय –

महात्मा गांधी यांचं मुंबईतील निवासस्थान म्हणजे मणिभवन.

ग्रॅण्टरोड येथील गांवदेवी विभागातील लॅबर्नम रोडवर हे ठिकाण असून एक ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याकडे पाहिलं जातं. जवळपास १७ वर्ष या ठिकाणी राहणाऱ्या महात्मा गांधी यांच्या काही वस्तूंचा येथे संग्रह करण्यात आला आहे. तसंच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित काही पुस्तके, लेखनसामुग्री, त्यांचा चरखा अशा अनेक गोष्टी येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे संग्रहालय दररोज सुरु असून सकाळी ९.३० ते ६ या वेळात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

२. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय –

मुंबईमधील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचं संग्रहालय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे पाहिलं जातं. फोर्ट परिसरात असलेलं हे संग्रहालय २० व्या शतकात बांधण्यात आलं आहे. या संग्रहालयाची रचना ब्रिटीश ऑर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांनी केलं असून या संग्रहालयाच्या रचनेत हिंदू मंदिर, राजपूत आणि इस्लामी वास्तू तंत्राचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या संग्रहालयांमध्ये दुर्मिळ चित्रे, हस्तलिखिते जतन करण्यात आली असून हे संग्रहालय छ. शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाजवळ आहे.

३. नेहरु तारांगण –

आकाशातील चंद्र चांदण्या पाहण्याचं वेड अनेकांना असतं. यात लहान मुलांसाठी तर चांदोबा म्हणजे एख आकर्षणचं असतं. आकाशगंगा जवळून पाहणं प्रत्येकाला शक्य नाही. मग अशा वेळी मुंबईतील नेहरु तारांगणला नक्कीच भेट दिली पाहिजे. नेहरु तारांगण येथे एक गोलाकार वास्तू असून त्यात जवळपास ६०० लोक एकाच वेळी बसू शकतात. येथे तुम्ही आकाशदर्शन करु शकता. वरळीमध्ये असलेलं नेहरु तारांगण दररोज खुलं असून केवळ राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी बंद असतं.

४. भाऊ दाजी लाड संग्रहालय –

भाऊ दाजी लाड संग्रहालय भायखळा परिसरात असून हे संग्रहालय पूर्वी व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझिअम या नावाने ओळखलं जात होतं. मात्र, त्यानंतर त्यांच नामांतरण करण्यात आलं. १८७२ मध्ये ही वास्तू बांधण्यात आली आहे. हे अत्यंत प्राचीन वस्तू संग्रहालय आहे.

५. जहांगीर आर्ट गॅलरी –

मुंबईतील सर्वात चर्चेत राहणारी आणि प्रसिद्ध वास्तू म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी. फोर्टमध्ये असलेल्या काळाघोडा परिसरात ही आर्ट गॅलरी असून येथे कायम विविध कलाप्रदर्शनं भरत असतात. १९५२ मध्ये उभारण्यात आलेल्या या वास्तूमध्ये अनेकदा वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात.

६. बेस्ट वाहतूक संग्रहालय –

अनेकांना रेल्वे, बस किंवा कोणत्याही प्रवासातील तिकीटे गोळा करण्याचा छंद असतो. जर तुम्हालादेखील असाच तिकिटं गोळा करायचा छंद असेल तर सायनमधील आनिक बस आगार येथे असलेल्या बेस्ट वाहतूक संग्रहालयाला नक्की भेट द्या. या संग्रहालयामध्ये बेस्टची जुनी आणि तितकीच वेगवेगळी तिकिटं पाहायला मिळतील. याचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ बेस्टचं नव्हे तर, त्या व्यतिरिक्त बस इंजिन, तिकिट तयार करण्याचं मशीनदेखील पाहायला मिळेल.

७. नेहरु सायन्स सेंटर-

वरळीमधील आणखीन एक पाहण्याजोगं ठिकाण म्हणजे नेहरु सायन्स सेंटर. भारतातील सर्वात मोठं विज्ञान केंद्र म्हणून याकडे पाहिलं जातं. या ठिकाणी ऐतिहासिक वैज्ञानिक वस्तू, उपकरणे यांचा संग्रह करण्यात आला आहे

८. रेड कार्पेट वॅक्स संग्रहालय –

घाटकोपरमधील आर सिटी मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. यात राजकारणींपासून ते खेळाडूंपर्यंत अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

९. भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय –

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा संग्रहालयामध्ये अनेक जुन्या आणि दुर्मिळ नाण्यांचं जतन करण्यात आलं आहे. यात अनेक प्राचीन नाणी असून विविध प्राचीन संस्कृतींचं यातून दर्शन होतं.

१०. नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट –

नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे विविध शिल्पे, चित्रे प्रदर्शनासाठी ठेवली जातात. या गॅलरीची निर्मिती १९९६ मध्ये करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा