जेष्ठ वकील बापू गव्हाणकर यांचा नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना टोला…
सावंतवाडीत भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा आणि स्टॉल धारकांचा प्रश्न राजकीय कुराघोडींमुळे जास्तच गुंतागुंतीचा होत चालला आहे. नूतन नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार गेली अनेकवर्षं भाजी मार्केटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवारा करून भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना उठवून भाजी मार्केट सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजी मार्केट अतिक्रमण हटाव मोहिमेत खरोखरच अतिक्रमण हटाव साठी केलेला अट्टाहास की भाजी मार्केटच्या जागेवर भविष्यात नवीन कॉम्प्लेक्स उभारून त्यातून आर्थिक उन्नत्ती साधण्याचा प्रयत्न होता हे मात्र कोडंच आहे. मिळालेल्या संधीचा पुरेपूर विनियोग करून घ्यायच्या प्रयत्नात सावंतवाडीतील कित्येक हाताच्या पोटावर जगणारे भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले याचाही विचार केला गेला नाही.
सावंतवाडी भाजी मार्केटची जागा अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे, काही गाळ्यांच्या केसीस सुरू आहेत, त्यामुळे नियोजित जागेवर तात्काळ कॉम्प्लेक्स उभारणे शक्य होणार नाही, परंतु पैसा असल्यावर काहीही शक्य होऊ शकतं हेही तितकेच खरे. त्यामुळे तात्काळ मार्केटमधील व्यापारी हटवून मार्केटने मोकळा श्वास घेतला म्हणणे म्हणजे शहाणपणा नक्कीच नव्हे. एकीकडे भाजी विक्रेते हटविणे आणि मटका टपरीवाल्यांकडून स्वागत करून घेणे हे हस्यस्पदच होते. आणि आता तर ती स्टायल व्हायला लागली आहे. कोणी आंदोलन केले, विरोध केला, की दुसऱ्या कोणालातरी हाताशी धरून अभिनंदन करून घ्यायचं.
दारूचे, मटक्याचे धंदे कोण करतं, कोणत्या पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आहेत हे जनतेला ज्ञात आहे तरी सुद्धा देखावा म्हणून दारुवाल्यांचा मिटींग घेण्यापेक्षा भाजीवाल्यांना न्याय द्या, गरिबांच्या भावनेचा अंत पाहू नका, सावंतवाडीतील जनतेने भल्याभल्यांना घरी बसविले आहे, कुणाची हाय घेऊ नका, असे सावंतवाडीतील प्रसिद्ध वकील बापू गव्हाणकर यांनी ठणकावून सांगितले. सावंतवाडीतील स्टॉल हटाव आणि भाजीवाल्यांच्या अतिक्रमण हटाव विरोधात झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात बापू गव्हाणकर यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि सहकारी यांच्यावर टीकेची झोड उठवताना सत्तेत बसलेले लोक सावंतवाडी विकण्याचा प्रयत्नात असून भविष्यात मोती तलावही विकला गेला तर आश्चर्य वाटू नये अशी कुरघोडी केली.
रात्रीच्या अंधारात अडीच वाजता सुद्धा मार्केटची पाहणी केली जाते म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी कुटील डाव असणारच. त्यामुळे सत्तेतील पुढारी जनतेच्या भल्यासाठी मार्केटची स्वच्छता करतात की स्वतःच्या हे मात्र सावंतवाडीकर जनतेला काहीच दिवसात दिसून यायला लागले आहे. सावंतवाडीत सत्ता बदल झाल्यावर सुरू झालेलं बदल्याचे राजकारण व्यापाऱ्यांना आणि गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांना त्रास देण्यापर्यंत आलेलं आहे. राजकीय इर्षेपोटी सुरू असलेलं हे राजकारण पाटेकराच्या भूमीत जास्त दिवस चालत नाही हा सुद्धा अनुभव आहेच.
सर्वपक्षीय आंदोलनाला सामोरे न जाता पालिकेतून पसार असलेल्यांवर वकील बापू गव्हाणकर यांनी तोंडसुख घेतलेच, परंतु बाहेर येऊन लोकांना सामोरे जा असेही आव्हान दिले. यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पडते, आनारोजिन लोबो, डॉ जयेंद्र परुळेकर, यांनी आपले विचार मांडले.