You are currently viewing सावंतवाडीच्या सौंदर्यात पडणार भर; शहराच्या सुशोभीकरणासाठी नगराध्यक्षांची विशेष मोहीम!

सावंतवाडीच्या सौंदर्यात पडणार भर; शहराच्या सुशोभीकरणासाठी नगराध्यक्षांची विशेष मोहीम!

दिवाळीच्या मुहूर्तावर उपक्रमाचा शुभारंभ; मोती तलाव परिसरासह सार्वजनिक ठिकाणांचा होणार कायापालट

सावंतवाडी : स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडीला अधिक आकर्षक आणि ‘अतिसुंदर’ बनवण्यासाठी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी विशेष सुशोभीकरण मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असून, शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि आकर्षक रंगरंगोटी करून त्यांना नवा लूक देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मोती तलाव परिसरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. धूळ आणि अस्वच्छतेमुळे या परिसराचे सौंदर्यही कमी झाले होते. याची दखल घेत नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी पुढाकार घेऊन या पायऱ्यांची स्वच्छता व आकर्षक रंगरंगोटी करून घेतली. या उपक्रमामुळे परिसराचे रूप पालटले असून, शहराच्या सुशोभीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

आगामी नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक पर्यटकांची मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. पर्यटकांना शहर अधिक आकर्षक वाटावे, यासाठी अनेक वर्षांपासून रंगरंगोटी न झालेल्या सार्वजनिक वास्तूंची देखभाल आणि सुशोभीकरण करण्याचा संकल्प नगराध्यक्षांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

सावंतवाडीचे प्रमुख आकर्षण असलेल्या मोती तलाव परिसरालाही या मोहिमेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. तलावाकाठी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र असलेला ‘केशवसुत कट्टा’, येथील ‘तुतारी’ शिल्प आणि ‘गणेश विसर्जन कट्टा’ परिसराचीही रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले जाणार आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी मोती तलाव आणि केशवसुत कट्ट्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या या संकल्पनेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य व क्रीडा सभापती तथा भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे सहकार्य लाभत आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर, पालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि शहरवासीयांच्या सहभागातून सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा