प्रस्थापितांच्या मानगुटीवर पाय देऊन जिल्हा बँकेत गेलोय : आता ही बँक मुठभर पुढाऱ्यांची नाही तर सामान्य शेतकऱ्यांची असेल : गोपीचंद पडळकर
आटपाडी : प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार
प्रस्थापितांचा मोठा विरोध असताना त्यांच्या मानगुटीवर पाय देवून सांगली जिल्हा बँकेत गेलोय. आत्ता ही बँक मूठभर पुढाऱ्यांची राहिली नाही. ती सर्वसामान्य शेतकऱ्यांची झाली आहे. असे स्पष्ट मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे बोलताना व्यक्त केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल झरे (ता. आटपाडी) येथील मारुती मंदिर चौकात सर्व सहकारी आणि समस्त झरे पंचक्रोशीच्या वतीने त्यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ” प्रस्थापितांचे सर्व डावपेच उधळून लावत मी ही निवडणूक लढवली. जतच्या स्वाभिमानी मतदारांनी मोठ्या फरकाने मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सहकाराच्या नावाखाली वर्षानुवर्षे स्वतःचे भले करणाऱ्यांनी आटपाडी, नागेवाडी, तासगाव, कवठेमहांकाळ महांकाली, जतचा राजे डफळे आणि सर्वोदय यांसारखे साखर कारखाने तसेच आटपाडी व विट्याच्या सूतगिरण्या बंद पाडून कवडीमोल भावात घशात घातल्या आहेत. ११ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेतून ३५०० कोटी रुपये फक्त कारखान्यांना दिले गेले, रिकाम्या गोडाऊनवर साखरेच्या नावाखाली शंभर कोटींची कर्जे उचलली गेली आणि बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधींचा गैरव्यवहार केला गेला. इतकेच नव्हे तर नवीन संचालक मंडळ निवडून आलेले असतानाही जुन्या संचालकांनी घाईघाईने बैठक घेऊन २८५ कोटींच्या कर्जाचा घाट घातला आहे. हा सर्व काळाबाजार रोखण्यासाठीच मी हातात चाबूक घेऊन बँकेत गेलो आहे.”
ते पुढे म्हणाले, ” जिल्हा बँकेतून मला एक रुपयाचेही कर्ज घ्यायचे नाही, ना बँकेचा भत्ता किंवा चहा घ्यायचा आहे. ज्या सामान्य शेतकऱ्याला आणि तरुणाला कोणाचीही राजकीय शिफारस नाही, त्यांच्या हक्कासाठी मी बँकेत स्वतःच्या खर्चाने स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहे. ठराविक कारखान्यांवर कोट्यवधींची खैरात करणाऱ्या बँकेने आता जिल्ह्यातील होतकरू तरुणांना उद्योगासाठी १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज द्यावे, सांगलीत शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना दरमहा १ हजार रुपये खोलीभाडे द्यावे आणि बँक कर्मचाऱ्यांचा पगार १० ते १५ हजारांनी वाढवावा, हाच आमचा मुख्य अजेंडा असेल.”
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे काळेवाडी येथील बुद्ध विहार, कुरुंदवाडी व झरे येथील घाट, खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान, घोडेखोरा व वाकसेवाडी रस्ता अशी कोट्यवधींची विकासकामे आपण पूर्ण केली आहेत. तसेच १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या टेंभूच्या आवर्तनाच्या पाण्याचा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वापर करावा असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मा.सभापती ब्रह्मानंद पडळकर,
भाजप तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले,ज्येष्ठ नेते चवरे साहेब, ,जि.प.सदस्य माधवी वहिनी पडळकर, आटपाडीचे नगराध्यक्ष यु. टी. जाधव सर, बंडू शेठ, वैशाली वहिनी कातुरे, दादासाहेब मोटे सर, सरपंच अंकुश पाटील हवालदार, महादेव पाटील,विष्णुपंत,विलास काका, बाबाजी पाटील, शंकर शेठ माने, सुळे सर, चंदू काळे, चंदू दौंडे साहेब, दिलीप बुवा खिलारी, गोरे साहेब, राजमाने साहेब यांच्यासह झरे पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
