You are currently viewing सिंधुदुर्गात स्थानिक दुर्लक्षित औषधी जांभूळ, सुरंगी सारख्या वनस्पतींचे संवर्धन करूया – कुलगुरू डॉ.संजय सावंत

सिंधुदुर्गात स्थानिक दुर्लक्षित औषधी जांभूळ, सुरंगी सारख्या वनस्पतींचे संवर्धन करूया – कुलगुरू डॉ.संजय सावंत

जिल्ह्यातील शेतकरी या प्रकल्पातून आर्थिक दृष्ट्या संपन्न होणार

वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या भागात जी जी स्थानिक दुर्लक्षित औषधी जांभूळ, पपई, सुरंगी, वावडिंग अशा वनस्पती सापडतात त्याचे संवर्धन करून त्याच भागात त्या वनस्पती मोठ्या प्रमाणात तयार करणे. तसेच यांची दर्जेदार कलमे निर्मिती करणे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागात प्रत्येकी ५ झाडे लावली तरी भविष्यात हा शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न झाल्याशिवाय रहाणार नाहीत. आपण गेल्या तीन दिवसांमध्ये येथील विविध भागातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या असता शेतकरी, जिल्हा कृषी विभाग, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, आत्मा या सर्वांचे या प्रकल्पाला प्रोत्साहन असल्याने हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होणार आहे असा विश्वास डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले व लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आज वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकरी, शास्त्रज्ञ व पत्रकार यांची गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कुलगुरू डॉ. सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ पराग हळदणकर, वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, लुपिन फाउंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू, डॉ एम. पी. सणस, डॉ. व्ही. एस. देसाई, डॉ. सौ. एम. बी. कदम, देवगड येथील प्रगतशील शेतकरी जनार्दन तेलीआदी उपस्थित होते.

या चर्चेच्या सुरवातीला उपस्थितांचे स्वागत डॉ. बी. एन. सावंत यांनी केले. यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ संजय सावंत म्हणाले की, या वनस्पतीच्या माध्यमातून मिळणारे उत्पादन वाढले की या उत्पादनावर आधारित कंपन्या स्वतः पुढे येतील व याचा सर्व फायदा येथील स्थानिक शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे या प्रकल्पाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. डॉ पराग हळदणकर यांनी या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले. लुपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू यांनी सुद्धा या प्रकल्पा संदर्भात माहिती दिली. डॉ एम. पी. सणस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक दुर्लक्षित औषधी वनस्पती यामध्ये पपई, जांभूळ, सुरंगी, वावडिंग, वटसोल, त्रिफळ व कडीकोकम यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली. तर डॉ. सौ. एम. बी. कदम यांनी पपई विषयी विस्तृत माहिती दिली. दरम्यान प्रगतशील शेतकरी श्री तेली, श्री आळवे, यांनी या चर्चा सत्रात भाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. व्ही. एस. देसाई यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 6 =