You are currently viewing सावंतवाडी माठेवाड्यात भरवस्तीत पुरलेला तो मृतदेह पालिकेच्या परवानगी नंतरच???

सावंतवाडी माठेवाड्यात भरवस्तीत पुरलेला तो मृतदेह पालिकेच्या परवानगी नंतरच???

रहिवाशांच्या अर्जानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने मृतदेह काढला बाहेर.

सावंतवाडीत गेली कित्येकवर्षे माठेवाड्यात भारती मठ आहे. त्याच ठिकाणी भारती मठाचे मठाधिपती यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सदर मठाच्या जागेतच पुरण्यात आला होता. मठाचे मठाधिपती स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांना तिथेच पुरण्याची मठाची परंपरा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु या सर्व घडामोडीत अजून एक बाब गुलदस्त्यात आहे ती म्हणजे मृतदेह भरवस्तीत पुरण्याची गिरी कुटुंबाने सावंतवाडी नगरपालिकेची रीतसर परवानगी घेतली होती का?

माठेवाड्यात भरवस्तीत मृतदेह पुरल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार दिली होती, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे रहिवाशांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. विषय सावंतवाडी नगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याने पोलिसांनी पालिकेकडे बोट दाखवले. त्यानंतर माठेवाड्यातील रहिवाशांनी पुन्हा पालिकेकडे याबाबत विचारणा केल्यानंतर नगराध्यक्षांनी आपण राहिवाशांसोबत असल्याचे व तो मृतदेह बाहेर काढायला लावणार असेही सांगितले होते. परंतु सावंतवाडी नगरपालिका प्रशासन आपली जबाबदारी मृतदेह पुरण्यास परवानगी दिल्यामुळेच झटकत होती का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

सावंतवाडी नगरपालिकेच्या असहकार्यानंतर माठेवाड्यातील रहिवाशांनी सावंतवाडीतील अन्यायाविरुद्ध कायम उभे राहणारे वकील बापू गव्हाणकर यांच्याकडे धाव घेतली व बापू गव्हाणकर यांच्या सल्ल्यानुसार सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला व अखेरीस आज तो मृतदेह संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर काढून नियोजित जागेत पुरण्याचे आदेश देण्यात आले, आणि आदेशानुसार संध्याकाळी मृतदेह बाहेर काढला गेला.
सावंतवाडीत गेले काही दिवस सुरू असलेला मृतदेह भरवस्तीत पुरण्याबाबतचा वाद आज पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर शांत होईल, परंतु काय सावंतवाडी नगरपालिकेने मृतदेह त्याठिकाणी पुरण्यास परवानगी दिली होती का? हा प्रश्न मात्र सतावत राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा