*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*माझ्या आठवणीतील विद्यार्थी –*
प्रभाकर वानखडे : जिद्द, मेहनत आणि यशाचा प्रवास
माझ्या १९८६ सालच्या दहावीच्या बॅचला
प्रभाकर माझ्या वर्गात होता. अनेक विद्यार्थी आयुष्यात आले, शिकले, आपापल्या वाटांनी पुढे गेले. काहींची नावे काळाच्या ओघात विस्मरणात गेली, तर, काहींच्या आठवणी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमच्या घर करून राहिल्या. प्रभाकर वानखडे हा असाच माझ्या मनात कायमचा घर करून राहिलेला विद्यार्थी! विरुळ पूर्णा खेड्यातून तो शाळेत यायचा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. घरात अभ्यासाला पोषक वातावरण नव्हते. वडिलांचे व्यसन, गरिबीचे चटके आणि परिस्थितीने उभ्या केलेल्या असंख्य अडचणी… अशा वातावरणात स्वतःला सावरत शिकणारा हा मुलगा मात्र बुद्धिमान होता. त्याच्या स्वभावात नम्रता होती. आणि, मनात शिकण्याची जिद्द होती.
मी त्याला इंग्रजी आणि हिंदी शिकवत होते.
दहावी झाल्यानंतर त्याने डी.एड. केले. त्याला धारणीला नोकरी लागली.
पुढे तो मुख्याध्यापकही झाला. तरी, नियमितपणे त्याची पत्रे येत असत. तो मला विसरला नव्हता. बहुतेक वेळी त्या लहानशा पोस्ट कार्डावर त्याने पेननेच एक चित्र काढलेले असायचे. समाजव्यवस्थेच्या तुरूंगाच्या भिंतीआड अडकलेल्या व्यक्तीची तडफड त्या चित्रात स्पष्ट दिसायची. त्यावेळी मोबाईल नव्हते. त्याच्या पत्राला उत्तर लिहितांना, एकदा, मीच त्याला लिहिले होते, तू आता माझ्यात गुंतू नकोस. तुझा भविष्यकाळ उज्वल आहे, मोठा हो. त्यानंतर त्याची पत्रे येणे बंद झाले. पत्रे बंद झाली; पण त्याच्या आठवणी संपल्या नाहीत. काळ पुढे सरकत राहिला. २९ वर्षे नोकरी झाल्यावर
कोरोनाच्या काळात २०२० मध्ये त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली, आणि, एका नव्या वाटेचा शोध घेतला. तो कार्व्हिंग शिकला. त्यासाठी त्याने जवळपास २५००० रु खर्च करून आवश्यक त्या मशिन्स खरेदी केल्या. सर्वप्रथम त्याने त्याच्या १०वीच्या गुणपत्रिकेवरील माझ्या सहीची नेमप्लेट बनविली, नंतर त्याने चिखलदऱ्याच्या जंगलात सापडलेल्या लाकडांचा उपयोग करून जवळपास ५०० वस्तू बनविल्या. बहुतेक शिल्पे अखंड लाकडात असल्याने अतिशय काळजीने काम करावे लागले. त्याने चिखलदरा रोडवर, परतवाड्यापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगाव गढी या गावात एक लहानसे म्युझियम उभारले. त्याला कठ्ठ सिप्प गेह असे नाव दिले. माझा मो. नं. मिळवून मला फोन केला. अनेक वर्षे संपर्कात नसलेल्या प्रभाकरचा फोन पाहून मला आनंद झाला. त्याच्या मुझियमच्या उदघाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून मी यावे अशी त्याची इच्छा होती. मी माझी असमर्थता दाखविल्यावर त्याने चिखलदऱ्याच्या आदिवासी लोकांसाठी मनापासून काम करणाऱ्या, खोज संस्थेचे संस्थापक ॲड. बंड्याभाऊ साने यांच्या हस्ते इतर काही मान्यवरांच्या उपस्थितीत म्युझियमचे उदघाटन केले. आणि आठ पंधरा दिवसांनी फोन करून तो मला भेटायला घरी आला. येतांना त्याने आणलेली माझी नेमप्लेट म्हणजे माझ्यासाठी केवळ नाव कोरलेली वस्तू नव्हती.
त्या छोट्याशा कलाकृतीत एका विद्यार्थ्याच्या मनात आपल्या शिक्षिकेविषयी असलेला आदर होता,. कृतज्ञता होती. वर्षानुवर्षे मनात जपलेली एक आठवण होती.
माझी सही त्याने कोरली होती; पण त्या सहीच्या पलीकडे त्याने आमच्या नात्यातील एक सुंदर क्षण जतन केला होता.
आज मागे वळून पाहताना प्रभाकरचा संपूर्ण प्रवास आठवतो. गरिबीतून शिक्षणापर्यंत, शिक्षणातून नोकरीपर्यंत, नोकरीतून मुख्याध्यापकपदापर्यंत आणि तिथून कलेच्या नव्या वाटेपर्यंत…
त्याने स्वतःला घडवले. परिस्थितीशी झुंज दिली. स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केली.
प्रत्येक हुशार माणसाला त्याच्या बुद्धिमत्तेनुसार, कर्तृत्वानुसार आणि माणूस म्हणून असलेल्या गुणांनुसार जगता येते का?
मात्र, एक शिक्षिका म्हणून मला एवढे नक्की वाटते की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात किती मोठे व्हावे, यापेक्षाही त्यांनी, माणूस म्हणून किती समृद्ध व्हावे; हे महत्त्वाचे असते.
प्रभाकरने आयुष्यात अनेक टप्पे पार केले. त्याच्या कर्तृत्वाचा मला आनंद आहे. त्याच्या कलेचा अभिमान आहे. आता
त्याची पत्रे येत नाहीत. फोन ही येत नाही. तरी मी त्याच्या व तो माझ्या मनात सदैव आहे खऱ्या प्रेमाला शब्दांची गरज नसते ना?
प्रभाकर, तुझ्या आयुष्याच्या वाटेवर कितीही अडथळे आले, तरी तू स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जात राहिलास, तुझ्यातील विद्यार्थी, तुझ्यातील माणूस आणि तुझ्यातील कलावंत याचे खूप कौतुक वाटते.
काही विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात; पण शिक्षकांच्या मनातून कधीच बाहेर पडत नाहीत.
प्रभाकर त्यांपैकीच तू एक.
प्रभाकरसारखे काही विद्यार्थी आयुष्याच्या वाटेवर दूर निघून जातात; पण त्यांच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायमअसतात.
शिक्षकाच्या आयुष्यातील खरी कमाई म्हणजे त्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात मिळवलेले स्थान. शिक्षक म्हणून ३९ वर्षाच्या कारगिर्दीत आदर्श शिक्षक म्हणून मला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. मी स्वतः तसे प्रयत्नही केले नाहीत. परंतु, प्रभाकरसारखे अनेक विद्यार्थी आहेत की, जे माझे पुरस्कार आहेत , त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. उच्च स्थानावर असूनही त्यांना माझी आठवण आहे.
जीनेको और क्या चाहिये?
प्रतिभा पिटके
अमरावती
