You are currently viewing खानापूर तालुक्यात रब्बी ज्वारीच्या मिनीकिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

खानापूर तालुक्यात रब्बी ज्वारीच्या मिनीकिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विटा / प्रदीप जोशी ज्येष्ठ पत्रकार :

दुष्काळसदृश परिस्थितीत रब्बी ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून मिनीकिटद्वारे बियाणे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर २० नोव्हेंबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज राठोड यांनी केले आहे.

सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत कमी पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रब्बी ज्वारी हे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून, पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व आहे.

सन २०२६-२७ या वर्षात रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिनीकिटद्वारे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून, प्रतिकूल पर्जन्यमानाच्या परिस्थितीत अन्नधान्य व पशुचाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागणार आहे.

खानापूर तालुक्यासाठी ४ किलो प्रतिकिट याप्रमाणे एकूण २,००० मिनीकिट म्हणजेच ८० क्विंटल बियाणे वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता २० नोव्हेंबर २०२६ पूर्वी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज राठोड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा