राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त अंकुश सुतार सर यांचा तिथवली येथे सन्मान
शाळा व्यवस्थापन समिती व MEERA असोसिएशनच्या वतीने सत्कार; शाळेच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन.
तिथवली :
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर, तिथवली या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुश सुतार सर यांना नाशिक येथील अस्पायर फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर, तिथवली येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि मॉडर्न एज्युकेशन एम्पॉवरमेंट अँड रिसर्च असोसिएशन (MEERA) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी तिथवली येथील दिर्बादेवी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. ब्रह्मा हरयाण यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सुतार सर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना ग्रंथ आणि लेखणी भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला MEERA असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गुलजार काजी, तिथवली केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय पाटील सर,सोसायटी चेअरमन ब्रह्म हरयाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व तिथवली ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. ओमकार हरयाण, झाटे सर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना MEERA असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गुलजार काझी यांनी अंकुश सुतार सर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्या तीन वर्षांपासून सुतार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रातील प्रगती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेची प्रगती ही संपूर्ण गावाची प्रगती असून, शाळेला राज्यस्तरावर नावलौकिक मिळवून देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व संबंधितांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन गुलजार काझी यांनी केले. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. हा सत्कार संपूर्ण तिथवली गावाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी सुतार सर यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तिथवली केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय पाटील सर यांनीही अंकुश सुतार सर यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना श्री. अंकुश सुतार सर यांनी नाशिक येथील पुरस्कार सोहळ्यात व्यासपीठावरून तिथवली गावाचे नाव घेताना मन भरून आल्याची भावना व्यक्त केली. शाळेच्या आणि गावाच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असून, यापुढेही शाळेचे व तिथवली गावाचे नाव उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सचिन झाटे सर यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि आयोजकांचे आभार मानले. त्यानंतर सुतार सरांनी आणलेला खाऊ विद्यार्थ्यांना वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
या सत्कार सोहळ्यामुळे तिथवली गावातील शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
