सावंतवाडी शहर जिल्ह्यातील सर्वात सुंदर, शांत, सुसंस्कृत, सुशिक्षित लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. गैरधंदे हे सर्वच ठिकाणी असतात परंतु सावंतवाडी शहर म्हणजे गेले काही महिने गैरधंद्यांचे माहेरघर झाले आहे. दारू, मटका, जुगार, ड्रग सारखे गैरधंदे आज सावंतवाडीत होताना उघडकीस येत आहेत. तसं पाहता दारू, मटका हे गैरधंदे गेली अनेकवर्षं सुरू होते, परंतु जसजसं डिजीटलायझेशन झालं तसतसे गैरधंदे सुद्धा फोफावले. गेल्या वर्षभरात तर सावंतवाडीत मटक्याच्या बेकायदेशीर टपऱ्या जागोजागी उभ्या राहिल्या. मोठमोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने उभे राहिलेले मटक्याचे स्टॉल दिमाखात लोकांना लुबाडत आहेत. मटकेवाले मालामाल होताहेत आणि लावणारे आज राजा तर उद्या रंक म्हणून भीक मागताहेत.
सावंतवाडीत मटका स्टॉल वर खाकी वर्दीने मेहेरनजर केल्यावर दस्तुरखुद्द सावंतवाडी पालिकेचे धडाकेबाज मुख्याधिकारी जयंत जावडेकर स्वतः मैदानात उतरले आणि मटका स्टॉल वर कारवाई करण्यास सुरुवात केली. पालिकेच्या जागेत मटका घेऊ देणार नाही. ज्या टपरीवर ३ वेळा मुख्याधिकारी यांनी कारवाई केली त्याला आज ३.०० वाजेपर्यंत टपरी हटविण्यास सांगितले आहे, अन्यथा आपण गाळा फोडणार असा सणसणीत इशारा देत पालिकेकडून कारवाई सुरू केली आहे. भर बाजारपेठेत नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये, जागांमध्ये राजरोसपणे दिवसाढवळ्या रिकामी बिस्कीट पुडे लावून ठेवलेल्या टपऱ्या वर मटका घेतला जातो. परंतु त्यावर ना पोलीस कारवाई करत ना पालिका. त्यामुळे मुख्याधिकारी पोलीस प्रशासनावर नाराज दिसले.
मुख्याधिकारी मटका स्टॉलवर कारवाई करत असताना पोलीस मात्र नगरपालिकेच्या आवारात उभे होते, मुख्याधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण न देता त्यांनी नगरपालिकेत थांबण्याची भूमिका घेतली होती. याबाबत विचारणा केली असता आपण रवी जाधव स्टॉल वरील कारवाई करिता आल्याचे स्पष्ट केलं. मुख्याधिकारी यांनी जप्त केलेली रक्कम देखील उपस्थित पोलिसांनी न स्विकारता वरिष्ठांकडे जमा करावी असे सांगून करवाईपासून चार हात दूरच राहिले. त्यामुळे मटका स्टॉल वर होणारी कारवाई पोलिसांना रुचली नाही का? असा प्रश्न सावंतवाडीतील सुजाण नागरिकांना पडला आहे.
मुख्याधिकारी जावडेकर यांनी मटका स्टॉलवर कारवाई केल्यानंतर “जे गैरप्रकार आम्हाला दिसतात, सर्वसामान्य नागरिकांना दिसतात ते पोलिसांना का दिसत नाहीत”? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. सावंतवाडीतील जनतेने याबाबत आवाज उठवावा असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडीत सुरू असलेल्या गैरधंद्याबाबत, बेकायदेशीर मटक्याच्या टपऱ्या, दारूची खुलेआम विक्री, वाहतूक याबाबत मिडियामधून कित्येकवेळा प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे, परंतु ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप” अशीच काहीशी परिस्थिती खाकी वर्दीची झालेली आहे. आपली तुंबडी भरते तर लोकांचे काय देणेघेणे? असाच काहीसा प्रकार मटक्याबाबत खाकिवाल्यांचा झालेला आहे.
मटक्या, दारूच्या नादापायी नवीन पिढी बरबाद होत चालली आहे, तुकाराम मुंढे स्टायल ने गैरधंदेवाल्यांवर कारवाई करणारे मुख्याधिकारी सावंतवाडीत आहेत, परंतु खरोखरंच ज्यांनी गैरधंदे मुळापासून उखडून टाकले पाहिजेत आणि तेवढी ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते खाकी वर्दीचे पाईक जनतेचे रखवालदार मात्र डोळे बंद करून मजा पाहत आहेत. जोपर्यंत त्यांच्या आतील माणूस जागृत होत नाही तोपर्यंत हे गैरधंदे असेच सुरू राहतील. नवी पिढी वाचविण्यासाठी तरी खाकीचे रखवालदार गैरधंद्यांवर कारवाई करणार आहेत काय? असा प्रश्न आज सावंतवाडीकर नागरिक विचारू लागले आहेत.