You are currently viewing काकड आरती

काकड आरती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काकड आरती*

(वृत्त: लवंगलता)

 

कार्तिकातल्या भल्या पहाटे जाग अचानक आली

मंदिरातल्या पावन नादे प्रभात सुंदर झाली

 

शंखध्वनीच्या नादासंगे घंटा किणकिण करते

ढोल नगाऱ्या सोबत सहजी सूर मंजिरी धरते

श्रीसुक्ताचे बोल अनामिक हाक मनाला घाली

मंदिरातल्या पावन नादे प्रभात सुंदर झाली

 

दाट कोवळे धुके सभोती हुळहुळणारी थंडी

लगबग लगबग कुठे चालल्या भक्तांच्या या झुंडी

चंदन गंधित टिळा शोभतो ज्याच्या त्याच्या भाली

मंदिरातल्या पावन नादे प्रभात सुंदर झाली

 

शेवंतीच्या सोन फुलांनी प्रांगण सारे सजले

जुईफुलांच्या गंधासंगे आनंदाचे मजले

देव स्तुतीच्या गाण्यांमध्ये सृष्टी सारी न्हाली

मंदिरातल्या पावन नादे प्रभात सुंदर झाली

 

हळू हळू मग वाढत जाते भाट स्वरांची गोडी

मंगलमय ते सूर मंदसे देवपदाशी जोडी

दर्शन होता थेंब सुखाचे टपटप पडती गाली

मंदिरातल्या पावन नादे प्रभात सुंदर झाली

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

मोबाईल 9130861304

प्रतिक्रिया व्यक्त करा